Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

Bihar Hooch Tragedy: बिहारच्या छपरा जिल्ह्यातील मशरख, इसुआपूर, अमनौर आणि मधौरा पोलीस स्टेशन परिसरात बुधवारी विषारी दारू (Spurious Liquor) प्यायल्याने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काही लोकांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे, मात्र मद्यप्राशन केल्याने हा मृत्यू झाला आहे, याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र, मद्यप्राशन करून रात्री उशिरापर्यंत लोक आले होते आणि त्यानंतर एक-एक करून सर्वांची प्रकृती ढासळू लागली, असे मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक मंगळवारी स्थानिक दुकानात रात्री उशिरापर्यंत दारू पीत होते आणि घरी गेल्यानंतर ते आजारी पडले. यानंतर पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. (हेही वाचा -Spurious Liquor: विषारी दारू प्यायल्याने 8 जणांचा मृत्यू, बिहारच्या चंपारण येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, सारण जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गेल्या सोमवारी काही जणांनी मद्य प्राशन केले होते. सध्या यातील पाच जण रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. रूग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची आरडा-ओरड सुरू आहे.

इसुआपूरच्या डोयला गावात मंगळवारी रात्री 12 ते 13 लोकांची प्रकृती अचानक बिघडल्याची चर्चा होती. त्यानंतर रात्रीपासून सकाळपर्यंत एकामागून एक 14 जणांचा मृत्यू झाला. सर्वांनीच विषारी दारू प्राशन केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे, तर अमनौरच्या हुसेपूरमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. याशिवाय मरहौराच्या लाला टोला येथेही एका व्यक्तीच्या मृत्यूची बाब समोर आली आहे.

भाजपची बिहार सरकारवर टीका -

या घटनेवर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदारांनी विधानसभेबाहेर निदर्शने केली. या घटनेतील मृत्यूसाठी त्यांनी पोलीस आणि अवैध दारू बनवणाऱ्यांना जबाबदार धरले.