Sonia Gandhi On Political Retirement: मी कधीही निवृत्त झाले नाही आणि कधी होणारही नाही; राजकारणातील निवृत्तीच्या बातम्यांदरम्यान सोनिया गांधींचे महत्त्वपूर्ण विधान
Sonia Gandhi (PC- Facebook)

Sonia Gandhi On Political Retirement: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजकारणातून निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले आहे. त्या कधीच निवृत्त झाल्या नव्हत्या आणि कधीच निवृत्त होणार नाहीत, अशी माहिती काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिली आहे. या मुद्द्यावर सोनिया गांधींशी चर्चा झाल्याचे अलका लांबा यांनी म्हटले आहे. सोनिया गांधींचे हे विधान आता आले आहे, जेव्हा त्यांच्या रायपूरमधील भावनिक भाषणानंतर सोनिया गांधी आता राजकारणातून निवृत्त होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. या अटकळांना पूर्णविराम देण्यासाठीच त्यांचे हे वक्तव्य आले आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचे 85 वे अधिवेशन सुरू आहे.

रायपूरमधील कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी भाषण करताना भावूक झाल्या. काँग्रेस अध्यक्ष म्हणून आपल्या प्रवासाचा उल्लेख करत सोनिया गांधी यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. यादरम्यान सोनिया गांधी यांचा काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रवास आणि पक्षासाठी त्यांनी दिलेले योगदान दाखवणारा व्हिडिओही दाखवण्यात आला. (हेही वाचा -Sonia Gandhi On Political Retirement: काँग्रेस अधिवेशनात सोनिया गांधी यांच्याकडून राजकीय निवृत्तीचे संकेत, आयुष्यातील वळणदार क्षण आल्याचे उद्गार)

या व्हिडीओनंतर भावनिक भाषण करताना सोनिया गांधी यांनी सर्वांचे आभार मानले. 1998 साली काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून आजपर्यंत 25 वर्षात आपण मोठे यश संपादन केले आणि निराशेचा काळही पाहिला, असेही त्या म्हणाल्या. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे सोनिया गांधींनी वर्णन केले.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी भाषणात भारत जोडो यात्रेचे कौतुक केले. खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस यशस्वी होणार असल्याचा विश्वासही यावेळी सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. सोनिया गांधी पुढे बोलताना म्हणाल्या की, राहुल गांधींमुळे कठीण प्रवास शक्य झाला. त्यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेसची ताकद सांगून पक्ष देशहितासाठी लढणार असल्याचे सांगितले. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून शिस्तीने काम करण्याचा मंत्र सोनिया गांधींनी दिला. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, असेही त्या म्हणाले.