सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि केंद्रिय मंत्री स्मृती इराणी (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

केरळ येथील शबरीमाला मंदिरात महिलांच्या मंदिर प्रवेशावरुन व्यक्त केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी टीकेच्या धनी झाल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याबाबत देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. स्मृती इराणी यांच्या याच वक्तव्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही जोरदार हल्ला चढवला आहे. इराणींच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना 'मासिक पाळीदरम्यानच्या काळात स्मृती इराणी संसदेत जात नाही का?', असा सवाल देसाई यांनी विचारला आहे. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत इराणी यांनी 'मासिक पाळीदरम्यान रक्तानं माखलेला पॅड घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाल का?' असे प्रश्नार्थक विधान केले होते.

देसाई यांनी 'बीबीसी मराठी'शी संवाद साधताना स्मृती इराणी यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, लोकशाहीमध्ये आपण देशाच्या संसदेलाही मंदिरच मानतो. मग, मासिक पाळी आल्यावर स्मृती इराणी जात नाहीत का? केंद्रिय मंत्री म्हणून काम करत नाहीत का? असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना अनेकदा आमचे नियोजित दौरे असतात. आम्हाला विविध ठिकाणी आरतीला बोलावले जाते. पण, केवळ मासिक पाळी आली आहे म्हणून आम्ही हे दौरे कधीच टाळत नाही. उलट अधिक उत्साहाने आम्ही आमचे दौरे पूर्ण करतो, असेही देसाई यांनी सांगितले. (हेही वाचा, स्मृती इराणींचे वादग्रस्त विधान म्हणाल्या ''रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मित्राच्या घरी घेऊन जाल?'')

ब्रिटीश हाय कमीशन आणि ऑब्जर्वर रिसर्च फाऊंडेशनने संयुक्तपणे 'यंग थिंकर्स' परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलत असताना स्मृती इराणी यांनी महिलांना मंदिर प्रवेश आणि मासिक पाळी याबाबत विधान केले होते. 'तुम्हाला मंदिरात पूजा करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ आपल्यला अपवित्र करण्याचाही अधीकार मिळाला आहे असा नव्हे. मासिक पाळीदरम्यान तुम्ही मंदिरात कसे काय प्रवेश करु शकता?' असा सवाल उपस्थित करत 'रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही मित्राच्या घरी घेऊन जाऊ शकता का?', असा सवाल स्मृती इराणी यांनी उपस्थित केला होता.