सरकार स्थापनेबाबत शिवसेना-राष्ट्रवादी यांचा एकमेकांना प्रस्ताव नाही, सोनिया गांधी यांच्यासोबत पुन्हा चर्चा करणार: शरद पवार
Sharad Pawar | (Photo Credits: twitter)

भाजपमधील मोठा वर्ग शिवसेनेच्या संपर्कात असावा, त्यामुळेच शिवसेना नेते 175 हा आकडा सरकार स्थापनेसाठी सांगत असावेत, अशी गुगली टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय स्थितीबाबत शरद पवार यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासोबत राजधानी दिल्ली (Delhi) येथे आज (4 नोव्हेंबर 2019) चर्चा केली. या चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार दिल्ली येथे बोलत होते. दिल्ली येथे बोलताना शरद पवार म्हणाले, सरकार स्थापनेबाबत किंवा पाठिंबा देण्याबाबत शिवसेना (Shiv Sena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा नाही. तसेच, शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव अद्याप देण्यात आला नाही.

मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटलो. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुंबईत एकत्र बैठकीत ठरवले होते की, महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करावी. त्यानुसार मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते ए के अँटनी यांना भेटलो. या भेटीत राज्यातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. या भेटीमध्ये झालेल्या चर्चेनंतर आम्ही पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरवले आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्रीपद वगळता 50-50 फॉर्म्युला स्वीकारण्यास भाजप तयार; सत्तावाटपाचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात - सूत्र)

दरम्यान, याच पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, उद्याच मी मुंबईत जात आहे. मुंबईत गेल्यावर मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करेन. त्यानंतर पुन्हा एकदा आमच्यात बैठक होईल आणि पुढील निर्णयावर विचार करण्यात येईल, असे पावार यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची आज राजधानी दिल्लीत चर्चा सुरु आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दैऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तर, शरद पवार हे काँग्रेस पक्ष हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे नजीकच्या काळात या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालथ झाल्याचे पाहायला मिळू शकते.