साखरपुड्यानंतर काही दिवसातच सेल्फीच्या नादात तरूणीने गमवला जीव
Representational Image (Photo Credits: pixabay)

सेल्फीच्या (Selfie) नादात अनेकांनी आपला जीव गमवला आहे. यातच साखरपुडा झालेले एक कपल विहिरीच्या पायऱ्यांवर सेल्फी काढत असताना त्यापैकी एकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना चैन्नई येथील एका गावात घडली. साखरपुडा झालेले हे जोडप शेतात फिरायला गेले असताना तरुणीने तरुणाकडे विहिरीच्याजवळ सेल्फी काढण्याचा आग्रह केला. मात्र, त्यावेळी तरुणीचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली. तरुणीला वाचवण्यासाठी तरुणानेही विहिरीत उडी मारली. मात्र त्याच्या हाती अपयश आले आहे. तसेच या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

टी. मर्सी हीचा डी. अप्पू नावाच्या तरुणाशी विवाह होणार असून त्यांच्या काही दिवसापूर्वीच साखरपुडा झाला होता. साखरपुडा झाल्यानंतर सोमवारी मर्सी आणि अप्पू हे दोघेही गावातील एका शेतात फिरायला गेले. त्यावेळी मर्सीने अप्पूसोबत विहिरीजवळ सेल्फी काढण्याचा आग्रह केला. त्यानुसार, अप्पू आणि मर्सी विहिरीच्या जवळ जाऊन सेल्फी घेऊ लागले. परंतु त्याचवेळी मर्सी हिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. मर्सी पाण्यात पडल्यानंतर अप्पू याने लगेच विहिरीत उडी घेतली. त्यावेळी त्या परिसरात असलेल्या एका शेतकऱ्यांने त्यांचा आवाज एकून संबधित ठिकाणी धाव घेतली. शेतकऱ्याने अप्पूला वाचवले. मात्र, मर्सीचा शोध लागला नाही. त्यानंतर अग्नीशमन दलाने मर्सीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. हे देखील वाचा- आता गोव्यात सेल्फी काढणे पडू शकते महागात

सध्या तरुणांमध्ये सेल्फीचे वेड वाढत चालले आहे. त्याचबरोबर सेल्फी काढत असताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, असे असतानाही अनेकजण सेल्फीच्या नादात आपल्या जीवाची पर्वा न करता सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे.