पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली, की ओढ लागते कुठेतरी फिरायला जाण्याची. अशावेळी फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील लोकांचे आवडते ठिकाण गोवा याला हमखास पसंती मिळते. शांत, दूरवर पसरलेले बीचेस, निसर्गरम्य सौंदर्य, तारुण्याने भारलेले वातावरण यामुळे दिवसेंदिवस गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. एकदा का गोव्याला गेलो तर, वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह कोणाला होणार नाही?

मात्र किनारपट्टीवर, खडकांवर उभे राहून सेल्फी घेण्याच्या नादात प्राण गमावणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही. म्हणूनच सरकार नियुक्त जीवरक्षक एजन्सी ‘दृष्टी मरीन’ने गोव्यातील २४ ठिकाणे ही ‘नो सेल्फी’ झोन म्हणून घोषित केली आहेत. या ठिकाणावर अशा प्रकारचे साईन बोर्डही लवकरच लावण्यात येतील. याचाच एक भाग म्हणून गोव्यातील काही बीचेस ही ‘नो स्विम झोन’ म्हणूनही घोषित करण्यात आली आहेत.

उत्तर गोव्यातील बागा नदी, दोनापावला जेटी, सिकेरी किल्ला, हणजूण, वागातोर, मोरजी, आश्वे, हरमल, केरी व बांबोळी आणि शिरडाव तर दक्षिणमधील आंगोद, बोगमालो, होलांत, बायणा, जपानिझ बाग, बेतुळ, कणांगाइणी, पालोले, खोला, काबो द रामा, पोळे, गालजिबाग, ताळपोणा व राजबाग या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करता १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये पर्यटकांनी समुद्रात न जाण्याचे आदेशही दृष्टी मरीनने दिले आहेत. यासाठी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ६ पर्यंत लाइफगार्डसची नजर अशा बीचेसवर आणि नो सेल्फी झोनवर असणार आहे. संध्याकाळी ६ नंतर समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा नियंत्रण पथकाची गस्त असणार आहे. त्यामुळे गोव्याला गेल्यानंतर फोटो अथवा सेल्फी काढताना अशा साइन बोर्ड्सकडे आवर्जून लक्ष द्या कारण, दृष्टी मरीनने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळले तर त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.