20 कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या पेटीएमच्या सचिवसह नवऱ्याला अटक
फोटो सौजन्य- गुगल

पेटीएमचे मालक विजय शेखर शर्मा यांची खासगी माहिती चोरुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करणारे प्रकरण समोर आले आहे. तसेच या प्रकरणी पेटीएमच्या तीन कर्मचाऱ्यांनी ही माहिती चोरुन ती सर्वत्र पसरवू असे सांगून धमक्या देण्यात येत होत्या. तर या प्रकरणी एक महिलासुद्धा सामील असून ती विजय शर्मा याची सचिव असल्याचे उघडकीस आले आहे.

विजय शर्मा 20 सप्टेंबर रोजी जपानला काही कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरुन धमकी देणारा फोन आला होता. तसेच फोन आलेल्या नंबरवरील व्यक्तीने आपल्याकडे पेटीएमच्या कंपनीची गुप्त माहिती असल्याचे सांगून 20 कोटींच्या खंडणीची मागणी केली. ही सर्व माहिती त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांकडूनच मिळाली असल्याचे शर्मा यांना सांगण्यात आले. त्यामुळे शर्मा यांनी गौतम बुद्ध नगर पोलिसात या खंडणीसाठी आलेल्या फोनची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शर्मा यांची सचिव सोनिया धवन आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.

तसेच या प्रकरणातील देवेंद्र कुमारला ही अटक केली असून चौथ्या आरोपीने पळ काढला आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर आरोपी सोनिया ही शर्मा यांच्याकडे गेली 10 वर्षे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.