Sanjay Roy Gets Life Imprisonment: कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावण्यात आली आहे. यासोबतच त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याशिवाय न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबाला 17 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. संजय रॉय(Sanjay Roy) याला बीएनएसच्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. या कलमांनुसार, गुन्हेगारासाठी कमाल शिक्षा मृत्युदंड किंवा जन्मठेपेची आहे. पण न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
संजय रॉयचा दावा
शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाधीशांनी संजय रॉय याला म्हटले की, "आरोपीला आधीच सांगितले होते की त्याच्यावरील बलात्कार आणि खून असे सर्व आरोप सिद्ध झाले आहेत." यावर संजय रॉय याने प्रतिक्रीया दिली की, "आरोप सिद्ध झाले आहेत यात शंका नाही.त्याला कारणास्तव अडकवण्यात आले आहे. मी नेहमी रुद्राक्षाचे मणी घालतो. जर मी गुन्हा केला असता तर गुन्ह्याच्या ठिकाणीच जपमाळ तुटली असती. मला बोलण्याची परवानगी नव्हती. अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीने स्वाक्षरी करण्यात आली."
"जेव्हा सीबीआयने हे प्रकरण ताब्यात घेतले तेव्हा येथील रेल्वे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली परंतु काहीही आढळले नाही," असा दावा संजय रॉय यांनी केला. न्यायाधीशांनी त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याला आई आहे. पण, अटकेनंतर कोणीही त्याला भेटायला आले नाही. त्याने सांगितले की त्याने गुन्हा केला नव्हता, पण त्याला दोषी ठरवण्यात आले.
फॉरेन्सिक अहवाल, साक्षीदार, पॉलीग्राफ चाचण्या, सीसीटीव्ही कॅमेरे
आरोपपत्रानुसार, संजय रॉयने हा गुन्हा एकट्याने केला होता. पीडितेकडून घेतलेला वीर्य नमुना त्याच्याशी जुळला. सीएफएसएलच्या अहवालात हे वीर्य संजय रॉय याचे असल्याचे सिद्ध झाले. अनेक भौतिक-परिस्थितीजन्य पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालांच्या आधारे, त्याने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये हे केस संजय रॉय यांचे असल्याचे सांगण्यात आले.
सुमारे 100 साक्षीदार, 12 पॉलीग्राफ चाचण्या, सीसीटीव्ही कॅमेरे, फॉरेन्सिक रिपोर्ट, मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशन, इअरफोन्स आणि आरोपींचे जबाब तपासल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये सीबीआयने हे देखील स्पष्ट केले आहे की प्रशिक्षणार्थी ज्युनियर डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाला नव्हता तर एका माणसाने बलात्कार केला होता.