रेल्वे तिकीट महाघोटाळा:  तब्बल साडेतीन कोटी रुपयांची तिकिटे बेकायदा विकली; एकाच दिवशी कारवाई करत 387 एजंटना अटक
Ticket counter (Photo Credits: PTI)

देशात अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार उफाळला असल्याची लोक तक्रार करत असतात. या भ्रष्टाचाराचे अगदी रेल्वेच्या तिकीटांच्या भ्रष्टाचारापर्यंत (Railway Tickets Scam) याचे लोण पसरले आहे. याआधी रेल्वेच्या तत्काळ तिकिटांचा घोटाळा (Tatkal Scam) उघडकीस आला होता. आता ‘ऑपरेशन थंडर’ (Operation Thunder)अंतर्गत संपूर्ण देशात एकाच दिवसात कारवाई करत, तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या देशातील तब्बल 387 तिकीट एजंटना ताब्यात घेतले गेले आहे. रेल्वे सुरक्षा दल व इतर विभागांनी एकत्रित ही कारवाई केली आहे. मागीन काही आठवड्यांत उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे तिकिटांना प्रचंड मागणी होती. या काळात हा तिकिटांचा घोटाळा घडला आहे.

ताब्यात घेतलेल्या एजंटकडून, 33 लाख रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. आरोपींनी आतापर्यंत तब्बल 3 कोटी 25 लाख रुपये किमतीची तिकिटे बेकायदेशीरपणे विकल्याचेही समोर आले आहे. मागील काही महिन्यांत उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेने प्रवास करण्याचे प्रमाण वाढले होते. अशावेळी आरक्षण मिळत नसल्याने या एजंट्सनी लोकांना बेकायदेशीर मदत केली. त्यांनी तिकीट खिडकीसह ई-तिकिटींग सुविधेचा दुरुपयोग करून तिकिटे खरेदी करून प्रवाशांना ज्यादा किमतीला विकली.

(हेही वाचा: तत्काळ तिकिटांची अनधिकृत खरेदी-विक्री; तीन जणांच्या टोळीला अटक)

हा प्रकार वारंवार घडत असल्याने इतर अनेक प्रवाशांना तिकिटे उपलब्ध होत नव्हती. दरम्यान, एजंटकडून तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी रेल्वेच्या आयटी व टेक विभागाच्या मदतीने अशा एजंट्सची माहिती मिळवली. ‘ऑपरेशन थंडर’ या नावाखाली एकाच दिवशी देशात अशा एजंट्सवर कारवाई करण्याचे ठरवले. त्यानुसार 13 जून रोजी, देशातील 141 शहरांमधील 276 ठिकाणी छापा टाकून 387 एजंट्सना ताब्यात घेतले गेले. या एजंट्सवर गुन्हा दाखल करून त्यांचे आयडी व तिकिटे जप्त करण्याचे काम सुरु आहे