![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/04/Central-Train-784x441-380x214.jpg)
सध्या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण इतके वाढले आहे की, आजकाल कोणता ‘घोटाळा’ (Scam) होईल हे सांगणे अवघड आहे. सध्या देशात उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे, यामुळे अनेक लोक बाहेर फिरायला जातात. अशा पार्श्वभूमीवर तत्काळ तिकिटांचा घोटाळा (Tatkal Scam) उघडकीस आला आहे. यामध्ये मुंबई-दिल्ली प्रवासाची, प्रवासाच्या आदल्या दिवशी बुक केलेली 59 तिकिटे सापडली असून, त्या तिकिटांची किंमत 2 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 लोकांना अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
या तिकिटांमधील जास्तीत जास्त तिकिटे ही गोदान एक्सप्रेस, साकेत एक्सप्रेस अशा गाड्यांची आहेत. प्रवासाच्या आदल्या दिवशी ही तिकिटे दिल्ली, वाराणसी, कोलकाता, पटना अशा ठिकाणांवरून बुक करण्यात आली आहे. त्यानंतर ही तिकिटे विमानाने मुंबईला पाठवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाने सांताक्रुझ विमानतळावरील कार्गोवर धाड टाकून ही तिकिटे जप्त केली. ओळखपत्राशिवाय ही तिकिटे बुक केली गेली आहे, हे पाहता यामध्ये रेल्वे प्रशासनातील लोकही सामील असावेत असा अंदाज केला जात आहे. (हेही वाचा: IRCTC ची 'Book Now, Pay Later' नवी सुविधा; कसा घ्याल या सुविधेचा लाभ)
ज्या शहरातून प्रवास सुरु करायचा आहे तिथूनच तत्काळ तिकीट बुक केले जाऊ शकते, मात्र ही सर्व तिकिटे उत्तर भारतात बुक केली आहेत. ही तिकिटे मुंबईला पाठवल्यावर त्यांची 5000-10000 प्रति तिकीट अशी विक्री केली जाणार होती. या प्रकरणात मनोज काटकर, मनोज सिंह, रंजित सरोज यांना अनधिकृत तिकिटांची खरेदी आणि विक्री केल्याच्या आरोपाखाली आरपीएफ कायदा कलम 143 नुसार अटक करण्यात आली आहे.