File image of Actor Rajinikanth | (Photo Credits: PTI)

Tamil Nadu Assembly Elections 2021: चित्रपट अभिनेता आणि दक्षिण चित्रपट इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांनी शुक्रवारी (19 एप्रिल 2019) आपल्या अभिनय कारकिर्दीच्या बाहेरच्या क्षेत्राबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली. तामिळनाडू विधानसभा निवडणूक (Tamil Nadu Assembly Elections)लढविण्यास आपण सज्ज असल्याचे सांगत अभिनेता रजनीकांत यांनी आपल्या सक्रिय राजकारण प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले. रजनीकांत यांनी आपल्या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी त्यांना पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सत्ता मिळवतील काय असाही प्रश्न विचारला. यावर बोलताना त्यासाठी 23 मे पर्यंत वाट पाहावी लागेल असे ते म्हणाले.

निवडणुकीबाबत रजनीकांत यांना विचारले असता ते म्हणाले, जर लोकसभा निवडणुकीसोबत होत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीनंतर एआयडीएमके या पक्षासमोर अडचणी उभ्या राहात असतील तर आपण निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहोत. रजनीकांत यांनी सांगितले की, राजकारण आणि निवडणुकीच्या मैदानात दोन हात करण्यासाठी मी तयार आहे. मात्र, या निर्णयाबाबतची भूमीका आपण 23 मे नंतरच जाहीर करु असेही रजनीकांत म्हणाले.

तामिळनाडू राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या 38 जागांसाठी निवडणूक आणि विधानसभेच्या 18 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. विधानसभेच्या 18 जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीत होणारे मतदान अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. जर या जागांवर एआयडीएमके पराभूत झाली तर, राज्यात या पक्षाच्या सरकारसमोर सत्ता टिकविण्याचे मोटे संकट उभा राहू शकते. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ संपायला अद्याप बराच अवधी आहे. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 2021 मध्ये समाप्त होणार आहे. (संदर्भासाठी हेही पाहा: मोठी घोषणा: रजनीकांत आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाचीही माघार)

एएनआय ट्विट

दरम्यान, रजनीकांत यांनी अद्याप आपल्या पक्षाची घोषणा केली नाही. मात्र, त्यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे की, 2021 मध्ये ते विधानसभेच्या 234 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. तसेच, त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, आपण 2019 ची लोकसभा निवडणूक किंवा 2019 मध्ये तामिळनाडूमध्ये होणारी विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नाही.