काही आठवड्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections 2019) पार पडणार आहे, यामुळे देशात सर्वत्र सध्या निवडणुकीची धामधूम चालू आहे. सध्या राजकारणाचे चित्र हे थोडे पालटले असून, सरकारवर नाराज असलेल्या जनतेच्या कल्याणासाठी अनेक सेलिब्रिटी राजकारणात उतरले आहेत. यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे शिवाजी राव गायकवाड अर्थात दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth). आज रजनीकांत यांनी एक मोठी घोषणा केली आहे, आपला पक्ष किंवा आपण येणारी लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणीही वापरू नये असेही त्यांनी बजावले आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Rajinikanth in a statement has stated that his party or he will not be contesting in the Lok Sabha elections 2019. Also, he has mentioned that his photo or party symbol should strictly not be used for any propaganda. (File pic) pic.twitter.com/NTuSdYrExv
— ANI (@ANI) February 17, 2019
अभिनेते रजनीकांत हे 31 डिसेंबर 2017 रोजी आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा करत राजकारणाच्या रिंगणात उतरले होते. ‘रजनी मक्कल मन्दरम’ (Rajni Makkal Mandram) अशा नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला आहे. त्यानंतर त्यांनी अनेक प्रचार सभा घेतल्या, भाषणे दिली, लोकांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभागी होण्यापासून जाहीर पाठींबाही दर्शवला. हे पाहून रजनीकांत यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र अचानक रजनीकांत यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करून, जनतेच्या अपेक्षांवर पाणी सोडले आहे.
याआधी तामिळनाडूमध्ये अभिनेत्री जयललिता यांनी राजकारणात प्रवेश करून, सर्वांना धक्का दिला होता. त्यांच्या मृत्यनंतर तामिळनाडूमध्ये अनेक राजकीय बदल घडले. या पार्श्वभूमीवर दक्षिणेतील दोन मोठे सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन यांनी राजकारणात प्रवेश करून सरावांना चकित केले होते.