Congress Party | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) पक्षाच्या हंगमी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा पदावरील कार्यकाळ संपत आला आहे. त्यातच सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष पदावरुन दूर होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार की, पक्ष पुन्हा एकदा हंगमी अध्यक्षच निवडणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष पदाची चर्चाही पुन्हा एकदा सुरु झाली आहे. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने पक्षाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. आता तर कार्यकर्त्यांच्या भावना अधिकच आक्रमक झाल्या आहेत. त्यातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेस कार्यकारिणीने एक पत्र लिहिले आहे. या कार्यकारीणीत काँग्रेस कार्यकारिणीतील अनेक सदस्यांसह पाच माजी मुख्यमंत्री, अनेक खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडल्यानंतर सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्ष करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारणीने घेतला होता. दरम्यान, सोनिया गांधी यांनी कार्कर्त्यांच्या पत्राला उत्तर दिले असून, आपण पद सोडण्यास तयार आहोत. सर्वांनी एकत्र येत सक्रीय आणि कार्यक्षम नेत्याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

काँग्रेस कार्य समिती (सी डब्ल्यू सी) बैठक येत्या सोमवारी पार पडत आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीचे एक पत्र लिक झाले आहे. या पत्रात पुढे आले आहे की, काँग्रेस पक्षात नेतृत्व परिवर्तनाची मोठी मागणी होत आहे. पक्षातील सूत्रांच्या आधारे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष होण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, अध्यक्ष पदावर जर काँग्रेसचा इतर कोणता नेता दावा करत असेल तर मात्र पक्षात मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारण्यास या आधीच नकार दिला आहे. (हेही वाचा, खासदार सुरेश धानोरकर यांचा काँग्रेस पुनरुज्जीवीत करण्यासाठी पक्षाला महत्त्वपूर्ण सल्ला)

राजकीय वर्तुळामधून सांगितले जात आहे की, राहुल गांधी पक्षाचे महासचीव के. सी. वेणुगोपाल यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी सूचविण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक नेता आपापली रणनिती तयार करु लागला आहे. परंतू, जर कार्य समितीने जर निवडणूक घेण्याची घोषणा केली तर सरव प्रश्न निकाली निघू शकतात. दरम्यान, काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते पक्षातील नाराजांसोबत चर्चा करत असल्याचे समजते.

राज्यसभा खासदार पी. एल. पनिया यांनी म्हटले आहे की, आम्ही राहुल गांधी यांनाच पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी करत आहोत. पक्षाच्या इतर गटांचीही हीच मागणी आहे, असेही पुनिया यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे निलंबीत प्रवक्त संजय झा यांनी म्हटले आहे की, सुमारे 300 काँग्रेस नेत्यांनी संबंधीत पत्रावर सही केली आहे. हे नेते देशभरातील आहेत. मात्र, 23 नेत्यांचीच नावे पुढे येत आहेत.