मोदी सरकारने काल त्यांच्या कॅबिनेट मध्ये मोठे बदल केले आहेत. दरम्यान मंत्र्यांची खांदेपालट करताना महाराष्ट्राच्या 4 खासदारांना मंत्री पदी बढती मिळली आहे. यापैकी एक नाव म्हणजे नारायण राणे (Narayan Rane). राजकारणात शाखा प्रमुख पदापासून त्यांची सुरूवात झाली आणि काल पहिल्यांदाच त्यांच्यावर केंद्रीय मंत्रीपदाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात नारायण राणे विरूद्ध शिवसेना हा संघर्ष सर्वश्रूत आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याची देखील चर्चा आहे. आज शिवसेनेकडून मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणेंच्या कॅबिनेट मंत्री पदावर नियुक्ती होणं यावरून प्रतिक्रिया देताना ' जर राणेंना मिळालेलं केंद्रीय मंत्रीपद हे शिवसेनेला शह देण्यासाठी असेल तर तो कॅबिनेटचा अपमान आहे' असे म्हटलं आहे. नारायण राणेंसमोर महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचं तसंच करोना काळात कोलमडलेल्या उद्योगांना संजीवनी देण्याचं आव्हान असल्याचंही ते म्हणाले आहेत.
नारायण राणे यांच्यासोबत मोदींच्या मंत्रिमंडळात काल भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांचा देखील समावेश झाला आहे. यावर बोलताना' कपिल पाटील, भारती पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 'प्रोडक्ट' असल्याने मोदींनी शिवसेना आणि एनसीपी पक्षांचे आम्ही त्यांना केलेल्या पुरवठ्याबददल आभार मानायला हवेत अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. नक्की वाचा: PM Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार- नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार यांना केंद्रात मंत्रिपदे; थोडक्यात जाणून घ्या कारणे.
नारायण राणे यांच्याकडे मध्यम आणि लघु उद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारती पवार यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री, भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्री तर कपिल पाटिल यांच्याकेडे पंचायत राज राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नारायण राणे आज दुपारी साडे अकराच्या सुमारास आपल्या खात्याचा कारभार स्वीकरणार आहेत.
दरम्यान मोदींच्या मंत्रिमंडळामधून काल महाराष्ट्राच्या प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्र या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.