Karnataka Assembly Floor Test: हा कर्नाटक लोकशाही, प्रामाणिकपणा आणि जनतेचा पराभव; काँग्रेस-जेडीएस चं सरकार कोसळल्यानंतर राहुल गांधी यांचं ट्विट
Rahul Gandhi | (Photo Credit: Facebook)

Karnataka Assembly Floor Test: कर्नाटक (Karnataka) मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने काँग्रेस-जेडीएसचं सरकार आज कोसळलं. यावर राहुल गांधी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही स्वार्थी हेतूसाठी त्यांना पहिल्याच दिवशी लक्ष्य करण्यात आले. आज त्यांच्या स्वार्थाचा विजय झाला आहे. मात्र ही लोकशाही, प्रामाणिकपणा आणि कर्नाटक जनतेची हार आहे."

काँग्रेसच्या 21 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे कुमारस्वामी यांना सरकार टिकवायचे असल्यास त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार होते. मात्र त्यात ते अपयशी ठरले. काँग्रेस, जेडीएसच्या बाजूनं 99 आमदारांनी मतदान केलं. तर 105 मतं सरकारच्या विरोधात गेली. त्यामुळे आता कुमारस्वामींना सत्ता सोडावी लागली. (कर्नाटक मुख्यमंत्री कुमारस्वामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी; काँग्रेस-जेडीएस चं सरकार कोसळलं)

राहुल गांधी ट्विट:

भाजप मागच्या दाराने सत्तेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यात अनैतिक, अवैध आणि गैरसंवैधानिक सरकार येणार असल्याचा आरोप  कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमैया यांनी केला होता.

तर या विजयाचा आनंद भाजपकडून साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीसह, विजयाची निशाणी दाखवत जल्लोष करण्यात आला.