महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही त्यांनी एका मुलाखतीत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. मात्र, आज त्यांनी मनसे नेते अनिल शिदोरे (Anil Shidore) यांच्याकडे आज आपला राजीनामा दिला आहे. दरम्यान, रुपाली पाटील लवकरच नवीन पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुढील दोन दिवस राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर (Pune Visit) आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, रुपाली पाटील ठोंबरे आज 11 वाजता पत्रकार परिषद घेवुन आपली पुढील भुमिका जाहीर करणार आहे.
Facebook Post
पुण्यात आता लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मनसेनं पुण्यात पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील गेल्या अनेक महिन्यात पुण्याच्या दौऱ्यावर अनेकदा आल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, असं असताना आता रुपाली पाटील यांच्यासारख्या कडवट मनसे नेत्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षाची चिंता निर्माण झाली आहे. (हे ही वाचा Raj Thackeray on MVA: महाविकासाघाडी सरकार पडणार? राज ठाकरे यांचे मोठे विधान.)
कोण आहेत रुपाली पाटील-ठोंबरे?
रुपाली पाटील या पुण्यातील मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. तसेच तरुणांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आतापर्यंत पुण्यात अनेक आंदोलनं उभारली होती. त्यामुळेच त्यांची तरुण वर्गात अधिकच क्रेझ होती. रुपाली पाटील अनेकदा महिलांचे प्रश्न मांडताना दिसायच्या. तसेच त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे.
रुपाली पाटील यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक पदही भूषवलं आहे. मनसेमध्ये त्यांच्यावर विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. याशिवाय मनसे महिला शहराध्यक्ष पदही त्यांना देण्यात आलं होतं. तर पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक देखील त्यांनी लढवली होती.