Majeed Memon joins TMC: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजीद मेमन यांचा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश
Majeed Memon | Photo Credit - Twitter/ANI)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे माजी खासदार माजिद मेमन (Majeed Memon) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (Majeed Memon joins TMC) प्रवेश केला आहे. दिल्ली येथे त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress party) पक्षात आज (14 डिसेंबर) प्रवेश केला. माजीद मेमन हे पेशाने वकील आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एक कसलेले फौजदारी वकील म्हणून नावलैकीक मिळवला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससाठी बाजू मांडणारे माजिद मेमन आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी आवाज उठवताना दिसणार आहेत.

राजधानी दिल्लीत टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन आणि सौगत रॉय यांच्या उपस्थितीत माजिद मेमन यांच्यासोबत यांनी टीएमसीमध्ये प्रवेश पार पडला. माजिद मेमनचे टीएमसीमध्ये प्रवेश करतानाचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये माजिदसोबत टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन आणि सौगत रॉय दिसत आहेत. टीएमसीच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी माजिद मेमन यांचे तृणमूल काँग्रेसमध्ये स्वागत केले. (हेही वाचा, NCP On PM: मोदींकडे काही गुणवत्ता असून त्यांनी केलेले चांगले काम विरोधी नेत्यांना समजले नाही, राष्ट्रवादी नेत्याकडून पंतप्रधानांचे कौतुक)

माजिद मेमन हा प्रसिद्ध फौजदारी वकील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. ते 2014 ते 2020 पर्यंत ते महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) तिकिटावर खासदार (राज्यसभा) होते. त्यांनी कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय यावरील संसदीय समितीचे सदस्य आणि कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. माजिद मेमन यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केल्याने पक्ष मजबूत होईल, अशीभावना डेरेक ओब्रायन यांनी व्यक्त केली.

ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजीद मेमन यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. पंतप्रधान मोदींसारखे गुण विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये नाहीत. जर नरेंद्र मोदी लोकांची मते जिंकतात आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणूनही त्यांना पसंती मिळते. तर त्यांच्यात काही चांगले गुण असतील किंवा त्यांनी चांगली कामे असतील जी विरोधकांना जमली नाहीत. नंतर मात्र त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला. पंतप्रधान मोदी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे समर्थन करत नाही, असे त्यांनी म्हटले. आता माजिद मेमन यांच्या युतीचा टीएमसी आणि ममता बॅनर्जी यांना कितपत फायदा होतो हे पाहावे लागेल.