नांदेड लोकसभा मतदारसंघ: अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा, पंतप्रधान मोदींची सभा प्रताप चिखलीकर यांच्यासाठी ठरणार निर्णायक?
Nanded Lok Sabha Constituency Struggle between Congress, BJP and VBH | (Photo Credits: File Image)

Lok Sabha Elections 2019: नांदेड लोकसभा मतदारसंघ (Nanded Lok Sabha Constituency) अर्थातच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि पर्यायाने काँग्रेसचा बालेकिल्ला. अगदी मतदारसंघ स्थापनेपासून ते 2018 पर्यंत. केवळ 1977, 1989 आणि 2004 या तीन लोकसभा निवडणुकांचा अपवाद वगळता हा मतदारसंख काँग्रेसकडेच आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सध्या या मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधत्व करत आहे. लोकसभा निवडणूक 2019 साठीही काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्यावरच उमेदवारीची धुरा सोपवली आहे. चव्हाण यांना घेरण्यासाठी भाजपने येथून नांदेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप चिखलीकर (Pratap Patil Chikkalikar) यांना उमेदावारी दिली आहे. तर, वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) मराठीचे प्राध्यापक यशपाल भिंगे (Yashpal Bhinge) यांच्या रुपात इथे लढत आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. तर, काँग्रेसही इथे भक्कम पाय रोऊन उभी आहे. VBH इथे काय भूमिका निभावते यालाही महत्त्व आहे. या पार्श्वभूमिवर नांदेड लोकसभा मतदारसंघावर टाकलेली ही नजर.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरोधकांनी जिंकलेल्या 1977, 1989 आणि 2004 वर्षांतील लोकसभा निवडणूक निकालावर नजर टाकायची तर, त्या निवडणुकांमध्ये अनुक्रमे भाई केशव धोंडगे (शेकाप), डॉ. व्यंकटेश काब्दे (जनता दल) आणि डी. बी. पाटील (भाजप) असे उमेदवार निवडूण आले आहेत. या वेळीही इथे 2004 प्रमाणे धक्कादायक कामगिरी करत विजय मिळवायचाच यासाठी भाजपने जोर लावला आहे. त्यासाठी भाजप उमेदवार आमदार चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पक्षाने एक पथकच दिमतीला दिले आहे. हे पथक आणि चिखलीकरांचे कार्यकर्ते याच्यातील समन्वयाची जबाबदारी भाजपने सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांच्यावर सोपवली आहे. (हेही वाचा, हिंगोली लोकसभा मतदारसंघ: एकाच नावाचे 6 उमेदवार रिंगणात, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात? काँग्रेसच्या पंजाला शिवसेनेच्या बाणाचे आव्हान)

पंतप्रधान मोदींची सभा

अशोक चव्हाण यांचा शब्द अंतिम अशा स्थिती असलेल्या या मतदारसंघात भाजप आणि खास करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच लक्ष घातले आहे. भाजपच्या केंद्रीय पातळीवरुनही या मतदारसंघावर बारीक नजर आहे. कदाचित त्याचमुळे भाजपचा निवडणुक प्रचारातील चर्चित आणि प्रभावी चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या मतदारसंघात पक्षाने आयोजित केली असावी. अर्थात, नांदेड, हिंगोली आणि परभणी असे तीन मतदारसंघ डोळ्यासमोर ठेऊनच भाजपने नांदेड येथे मोदींच्या सभेचे आयोजन केले होते, हेही तितकेच खरे. (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

  • भोकर विधानसभा मतदारसंघ
  • नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ
  • नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ
  • नायगाव विधानसभा मतदारसंघ
  • देगलूर विधानसभा मतदारसंघ
  • मुखेड विधानसभा मतदारसंघ

एकूण सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता तर, भाजप, शिवसेना प्रत्येकी एका मतदारसंघात सत्तेवर आहेत. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात काँग्रेसला चांगलीच टक्कर दिली होती. या पार्श्वभूमिवर वंचित बहुजन आघाडीने इथे जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)

अशोक चव्हाण आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची निवडणूक

आजवर या मतदारसंघाने काँग्रेसला जोरदार साथ दिली आहे. काँग्रेससाठी वातावरण अनुकुल आणि प्रतिकुल असतानाही. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये निर्माण झालेल्या काँग्रेस विरोधी लाटेत भाजपची सरशी झाली. काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात धव्वा उडाला. महाराष्ट्रातून काँग्रेसाल केवळ 2 जागा मिळाल्या. एक हिगोली लोकसभा मतदारसंघ (राजीव सातव) आणि नांदेड येथून अशोक चव्हाण. 2014 च्या तुलनेत आता वातावरण बरेच बदलले आहे. तरीही काहीही करुन नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून हिसकाऊन घ्यायचाच हा चंग भाजपने बांधला आहे. भाजपची विजयाची प्रबळ इच्छा आणि अशोक चव्हाण यांना बालेकिल्ला कायम ठेवण्याची महत्वकांक्षा या संघर्षात हा मतदारसंघ काँग्रेस आणि भाजपसाठी आता केवळ लढाईन नव्हे तर प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे.

अशोक चव्हाण नांदेडमध्येच जायबंदी

नांदेड हा जरी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी, अशोक चव्हाण कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत. त्यामुळे ते नांदेडमध्येच तळ ठोकूण आहेत. अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आहे. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणे हे अशोक चव्हाणांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कर्तव्य असले तरी, त्यांनी सध्यातरी नांदेडकडेच बारीक लक्ष दिले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना विजयाची खात्र नाही. त्यांना पराभव दिसत आहे. त्यामुळेच ते नांदेडमधून हालत नसल्याची टीका विरोधकांनी सुरु केली आहे. त्याला काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले असले तरी, प्रत्यक्ष मतदान झाल्याशिवाय अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षाच्या भूमिकेत परतणार नसल्याचे चव्हाण यांचे स्थानिक कार्यकर्ते खासगीत सांगतात.

वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्यांवर भर

दरम्यान, वंचित बहुजन आगाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांना टक्कर देत पर्यायी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या मातब्बल पक्षांच्या तुलनेत आर्थिक सक्षमता आणि संसाधनांचा अभाव ही वंचित बहुजन आघाडीची प्रमुख मर्यादा आहे. आघाडीने उमेदवार दिले आहेत. मात्र, इतर पक्षांच्या तुलनेत आघाडीच्या उमेदवारांकडे संपर्क यंत्रणेचा अभाव आहे. त्यामुळे आघाडीचा उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आपाल्या ताकदीनुसार प्रचार करताना दिसत आहे.