Assembly Elections 2023: सन 2023 हे वर्ष अनेक कारणांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. प्रामुख्याने 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा (Lok Sabha Elections 2024) निवडणुकांपूर्वी एक राजकीय पार्श्वभूमी आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत महत्त्वाची पायाभरणी करेन. ज्यामुळे देशाचा एक राजकीय आवाज निश्चित होण्यास मदत होईल. याच वर्षात रंगेल सत्ताकारणाचा एक खेळ. जाणून घ्या नव्या वर्षात कोणकोणत्या राज्यांमध्ये होतील विधानसभा निवडणुका. सन 2023 मध्ये इशान्यभारत ते पश्चिम आणि दक्षीण भारतासह मध्य भारतातील राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका पार पडतील. यात प्रामुख्याने नऊ राज्यांचा समावेश आहे.
2023 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडणारी 9 राज्ये
- राजस्थान
- मध्य प्रदेश
- कर्नाटक
- छत्तीसगढ
- तेलंगणा
- त्रिपुरा
- मेघालय
- नागालँड
- मिझोराम
एकहाती सत्ता केंद्रीत झालेला भाजप आणि भाजपच्या राजकारण सत्ताकारणाला निकराचा विरोध करणारे सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशीक पक्ष यांच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जर राजकीय आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चांगली राहिली तर या नऊ राज्यांसोबतच जम्मू आणि कश्मीर राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका पार पडू शकतात. (हेही वाचा, New Year Eve 2023 HD Images: नवीन वर्षाचे HD Images पाठवून नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा, पाहा हटके शुभेच्छा संदेश)
काँग्रेसची दोन राज्यांमध्ये सत्ता
आगामी निवडणुकांना सामोरे जाताना नऊ राज्यांपैकी केवळ राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. उर्वरीत सात राज्यांमध्ये भाजप किंवा इतर पक्षांची सत्ता आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. त्या जोरावर काँग्रेस कशी कामगिरी करते याबाबतही उत्सुकता आहे.
राजस्थानमध्ये, काँग्रेसने 2018 मध्ये 200 सदस्यांच्या राज्य विधानसभेत 100 जागा जिंकून भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. 2013 मध्ये 163 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलेल्या भाजपला 2018 मध्ये केवळ 73 जागा मिळवता आल्या. 2023 मध्ये राज्यात पुन्हा भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. 1990 पासून राजस्थानमधील सत्ता भाजप आणि काँग्रेस यांच्यातच फिरत आहे.