गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री (Former Gujarat CM ) शंकरसिंह वाघेला (Shankarsinh Vaghela) आज (29 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ( Nationalist Congress Party) प्रवेश करत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) आणि राष्ट्रवदीचे पहिल्या फळीतील नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये शह काटशहाचे राजकारण रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि याच पक्षाकडून राज्य मंत्रिमंडळात मंत्री झालेले लक्ष्मणराव (LaxamanRao Dhoble) ढोबळे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) नुकताच प्रवेश केला. त्यामुळे खेळीचे उट्टे राष्ट्रवादी कसे काढते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पवार यांनी राजकीय खेळी करत पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भाजपचे होमपीच समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्येच डाव आहे. आता हा डाव राष्ट्रवादीला किती फायद्याचा ठरतो हे येणारा काळच सांगेन.
जनसेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यासपीठ - वाघेला
गुजरात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शंकरसिंह वाघेला हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. दरम्यान, या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत खुद्द वाघेला यांच्याच हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, वाघेला यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी एका व्यासपीठाची गरज असते. हे व्यासपीठ मिळत असल्यानेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला. राष्ट्रवाध्ये आपला प्रवेश ही एक चांगली गोष्ट असल्याचेही वाघेला यांनी सांगितल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. (हेही वाचा, लक्ष्मणराव ढोबळे यांचा राष्ट्रवादी पक्षाला रामराम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश)
वाघेला यांची राजकीय वाटचाल
दरम्यान, शंकरसिंह वाघेला यांची राजकीय वाटचाल पाहिली तर, त्यांनी राजकीय जीवनात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. मात्र, त्यासोबत त्यांच्या पक्षांतराचाही इतिहास मोठा आहे. स्वत: क्षत्रिय नेते असलेले वाघेला हे मुळचे भाजपचे. आपली राजकीय कारकीर्द त्यांनी भाजपसोबतच सुरु केली. पुढे 1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली. तेव्हा ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतल होते. मात्र, पक्षाने केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला आणि वाघेलांनी भाजपसोबत फारकत घेतली. काँग्रेसने बाहेरुन दिलेल्या पाठिंब्यावर ते 1996 मध्ये मुख्यमंत्री बनले. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश केला. केंद्रात मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार असताना त्यांना कॅबीनेट मंत्रिपदही देण्यात आले होते. तसेच, गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि गुजरात विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे नक्की केले आहे. त्यामुळे या पक्षप्रवेशाचा राष्ट्रवादी आणि स्वत: वाघेला यांना गुजरातमध्ये किती आणि कसा फायदा होते हे आगामी निवडणुकीतच कळणार आहे.