अमित शाह यांना व्हेटर्नरी डॉक्टर C.J. Chavda देणार टक्कर; गांधीनगर लोकसभा मतदारसंघ, 7 मुद्दे
C.J. Chavda and Amit Shah | (Photo Credit: File Photo)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेस (Congress) पक्षाने आपल्या उमेदवारांची 10 वी यादी जाहीर केली आहे. एकूण 20 उमेदवारांच्या या यादीत गांधीनगर लोकसभा मतदारसंघ (Gandhinagar Lok Sabha constituency)  उमेदवाराचाही समावेश आहे. डॉ. सी. जे. छावडा (C. J. Chavda)यांना काँग्रेसने गांधीनगर मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. गांधीनगर येथून भाजप (BJP) अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा तर, काँग्रेससाठी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी महत्त्वाचा आहे. गांधीनगर मतदारसंघ, भाजपसाठी त्याचे असलेले महत्त्व आणि, शाह यांची उमेदवारी आणि त्यांच्याविरोधात काँग्रेसने उतरवलेला उमेदवार याविषयी.

भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मतदारसंघ

गांधीनगर हा भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. कारण, भारतीय जनता पक्ष संस्थापकांपैकी एक असलेले लालकृष्ण आडवाणी हे गेली अनेक वर्षे या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. प्रचंड मताधिक्याने ते येथून निवडूण येत असत. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांचे देश आणि राष्ट्रीय राजकारणातील वजन पाहता हा मतदारसंघ नेहमीच वलयांकीत राहिला.

आडवाणी यांचा पत्ता कट अमित शाह रिंगणात

राष्ट्रीय आणि संसदीय राजकारणाता प्रदीर्घ अनुभव असलेल्या लालकृष्ण अडवाणी यंदा लोकसभा निवडणूकीतून बाहेर फेकले गेले आहेत. या वेळी आडवाणी यांना भाजपने तिकीट दिले नाही. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनीही काही काळ या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून आता भाजप तिकीटावर स्वत: अमित शाह हे निवडणूक लढत आहेत.

गांधीनगर जिंकण्यासाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली या मतदारसंघात काँग्रेसला धूळ चारण्यासाठी भाजपने निकराचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनाही अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसने प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना किती यश मिळते हे निवडणूक निकालानंतरच कळणार आहे. (हेही वाचा, भाजप नेत्याच्या घरावर छापा टाकून 17 बॉम्बसह, 116 काडतुसे जप्त; मोठे षडयंत्र आखण्याचा डाव उधळला)

अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी आमदार रिंगणात

गांधीनगर येथून अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेसने माजी आमदार डॉ. सी. जे छावडा यांना उमेदवारी दिली आहे. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. छावडा हे उत्तर गांधीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडूण आले आहेत. छावडा हे गुजरात काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्षही राहिले आहेत. भाजपचे स्थानिक नेते अशोककुमार पटेल यांचा पराभव करत छावडा यांनी विधानसभा निवडणुकीत बाजी मारली होती.

पक्षाध्यक्ष वरुद्ध व्हेटर्नरी डॉक्टर

गांधीनगर मतदारसंगात पक्षाध्यक्ष विरुद्ध व्हेटर्नरी डॉक्टर असा सामना रंगणार आहे. डॉ. सी. जे. छावडा हे मुळचे पेशाने व्हेटर्नरी डॉक्टर आहेत. पण, सोबत त्यांनी कायद्याची पदवीही घेतली आहे. सध्या ते व्यवसायाने बिल्डरही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण चहावाला असल्याचे वारंवार सांगत असतात. त्यामुळे अमित शाह यांच्या विरोधात प्रचार करताना छावडा हे आपल्या व्यवसाय, पेशाची जाहीरात करणार का याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, रेल्वे आणि विमानसेवा कंपनीकडून आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाकडून रेल्वे, उड्डाण मंत्रालयाला कारवाईचे आदेश)

अमित शाह यांच्या विजयाबाबत भाजपला खात्री

दरम्यान, गांधीनगर येथून शाह यांच्या विजयाबाबत भाजप नेत्यांना निवडणूक निकालापूर्वीच खात्री वाटत आहे. गांधीनगर ही जागा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळेच पक्षाध्यक्ष अमित शाह हे ईथून निवडणूक लढवत आहेत, असे अरुण जेटली यांनी सांगितले होते. दरम्यान, अमित शहा तर ही जागा जिंकतीलच पण गुजरातमध्ये सगळ्या २६ जागा भाजप जिंकेल, असाही दावाही जेटली यांनी केला होता.

गांधीनगर अमित शाह यांच्यासाठी होम पिच

दरम्यान, अमित शाह हे गुजरात विधानसभेत असताना त्यांनी सरखेज मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र, मतदारसंघ पूनर्रचना झाल्यावर त्यांनी नारनपुरा येथून निवडणूक लढवली. हे सांगण्याचे कारण म्हणजे हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ गांधीनगर मतदारसंघात येतात.

वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता गांधीनगर मतदारसंघात मतदार राजा कोणाच्या बाजून कौल देणार याबाबत उत्सुकता आहे. ही उत्सुकता 23 मे या मतमोजणीच्या दिवसापर्यंत कायम राहणार आहे.