Prashant Kishor Jan Suraaj Party Formation: जनसुराज अभियान आता राजकीय पक्ष बनणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त पटना येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात जनसुराजची राजकीय पक्ष(Jan Suraaj Party) म्हणून स्थापना करण्यात येणार आहे. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यासह अनेक निवृत्त आयएएस-आयपीएस अधिकारी आणि इतर राजकीय पक्षांचे नेतेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. (हेही वाचा: PM Narendra Modi: विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राला देणार 11,000 कोटीचं 'गिफ्ट')
सुमारे अडीच वर्षांच्या प्रयत्नांनंतर लोकसहभागाच्या माध्यमातून जनसुराजचे 2 ऑक्टोबर रोजी राजकीय पक्षात रूपांतर होणार आहे. त्यामुळे आता प्रशांत किशोर थेट निवडणुकीच्या राजकारणात सहभागी होणार आहेत. जनसुराज हा कोणत्याही व्यक्तीचा, कुटुंबाचा, जातीचा किंवा वर्गाचा नसून, बिहारमधील व्यवस्था बदलण्यासाठी दृढनिश्चयी लोकांचा समूह असेल, असा अधिकृत दावा करत प्रशांत किशोर यांनी पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा केली आहे.
जनसुराज मोहिमेची कल्पना 2 मे 2022 रोजी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण बिहारमध्ये सुमारे पाच हजार किलोमीटरची पदयात्रा आणि जनसंपर्क केल्यानंतर आता राज्यातील व्यवस्था बदलण्यासाठी या मोहिमेला राजकीय पक्षाचे स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे अधिकृत प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे. गांधी जयंतीनिमित्त पाटणा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी २ ते ५ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून जनसुराज हा राजकीय पक्ष म्हणून घोषीत करण्यात येणार आहे. मंचावर प्रशांत किशोर यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यांच्यासोबत निवृत्त आयएएस-आयपीएस अधिकारी आणि इतर राजकीय नेते असतील.