Photo Credit- X

PM Narendra Modi: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी पुणे येथील मेट्रोच्या कामाचे लोकार्पण केले जाणार आहे. दुपारी 12.30 ते 1.05 यावेळेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हे लोकार्पण होणार असून यावेळी मोदींकडून महाराष्ट्राला तब्बल 11,200 कोटींच्या विकास प्रकल्पाचे गिफ्ट दिले जाणार आहे. (हेही वाचा: Lata Mangeshkar Birth Anniversary: लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली; आठवणींचा लेखही केला शेअर)

यात पुणे मेट्रोचा जिल्हा न्यायालय ते स्वारगेट विभाग, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, सोलापूर विमानतळ आणि इतर यांचा समावेश आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गावरील मेट्रोच्या कामाला तब्बल 1,810 कोटी रुपये खर्च येणार आहे. पुणे मेट्रो फेज-१ च्या स्वारगेट ते कात्रज विस्ताराची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार असल्याचे पीएमओने सांगितले आहे. यासाठी अंदाजे 2,955 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे उद्घाटन करतील. त्यासोबतच पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (फेज-1) पूर्ण होईल.

अंदाजे 5.46 किमीचा हा दक्षिण विभाग मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे. पंतप्रधान राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत 7,855 एकर क्षेत्राचा कायापालट करणारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे देखील ऑनलाइन लोकार्पण केले जाणार आहे.

याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्मारक पुण्यातील भिडे वाडा येथे पहिल्या मुलींच्या शाळेचं भूमिपूजन देखील केले जाईल. तर बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर लोकार्पण आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने केले जाईल.