Eknath Khadse: 'त्या' वक्तव्यावरून एकनाथ खडसे यांनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी
Eknath Khadse | (File Photo)

भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या खडसे यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे. मुक्ताईनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी फडणवीस आणि त्यांच्यादरम्यानच्या वादाबद्दल भाष्य केले होते. तसेच दोघांमधील वादाचे कथन करताना "मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिले", असे विधान खडसे यांनी केले होते. या वक्तव्यावरून खडसे यांनी ब्राह्मण समाजाची (Brahmin Community) माफी मागितली आहे. ब्राह्मण बांधवांच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. मी कायमच ब्राह्मणांचा आदर केला आहे, असे खडसे यांनी ट्विटरच्या माधमातून म्हटले आहे.

दि. 6 नोव्हेंबर 2020 रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा आशयाचे ट्विट एकनाथ खडसे यांनी केले आहे. हे देखील वाचा- आमदार रोहित पवार यांच्यासाठी जामखेड मध्ये चिमुकल्या भावा-बहिणीचं अफलातून ग्रीटिंग कार्ड! पहा ट्वीट

एकनाथ खडसे यांचे ट्विट-

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितले गेले नाथाभाऊ तू आता घरी बैस मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटले घे रे तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे,” अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.