COVID-19 संंकटकाळात USA ने केलेल्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानत केले 'हे' खास ट्विट
PM Modi with Donald Trump | File Image | (Photo Credits: Getty Images)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोबाधित रुग्णांसह बळींचा आकडा सुद्धा झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसूत त्यासाठी वैज्ञानिक संशोधन करत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहे. या उपाचरामुळे आतापर्यंत बहुसंख्य नागरिकांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. याच दरम्यान, अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर आणि कोरोनावरील लस तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करण्याचे जाहीर केले होते. याप्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, या संकटकाळात आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा देत आहोत. अशा काळात हे सुद्धा महत्वाचे आहे की सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन काम करण्यासोबत लवकरात लवकर जगाला स्वस्थ आणि कोरोनामुक्त करायला हवे. तसेच नरेंद्र मोदी यांनी भारत आणि अमेरिका यांच्यामधील मैत्रीसंबंधात अधिक ताकद असल्याचे ही ट्वीट मध्ये स्पष्ट केले आहे.(कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी भारताला अमेरिका व्हेंटिलेटर, लसीच्या विकासासाठी मदत करणार- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प)

दरम्यान, कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी भारताने सुद्धा अमेरिकेला हाइड्रोक्लोरोक्विन औषध दिले होते. अमेरिकेत सध्या कोरोनाची भयंकर परिस्थिती असून 84 हजारांच्या पार बळींचा आकडा गेला आहे. भारतात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा 85 हजारांच्या पार गेला असून 2752 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु 18 मे पूर्वी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कोणते नियम शिथील करण्यात येणार हे स्पष्ट केले जाणार आहे. त्यामुळे आता सर्व जनतेचे लक्ष केंद्राच्या या निर्णयाकडे लागून राहिले आहे.