Kareena Kapoor-Khan | (Photo courtesy: archived, edited images)

Lok Sabha Elections 2019: राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगड आणि तेलंगणा या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवल्यावर आगामी लोकसभा निवडणुकीतही हिच पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेसने (Congress) मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपला टक्कर द्यायची तर तोडीस तोड उमेदवार द्यायला हवा याचीही जाणीव काँग्रेस नेतृत्वाला (Congress Leadership) आहे. त्यामुळेच लोकप्रिय आणि चर्चीत चेहऱ्यांना काँग्रेसकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. या संधीमध्ये बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) हिचेही नाव असल्याचे समजते. काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या सूत्रानुसार, काही काँग्रेस आमदार आणि नेत्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कमेटीचे (PCC) प्रमुख कमलनाथ (CM Kamalnath) यांना पत्र दिले आहे. या पत्रात करीनाला संधी देण्याबाबत उल्लेख आहे. काँग्रेस गेली 40 वर्षे भोपाळ (Bhopal) मतदारसंघातून पराभूत होत आहे. मात्र, या ठिकाणी करीना कपूरला तिकीट दिल्यास या ठिकाणीही विजय मिळू शकतो, असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे. (हेही वाचा, लोकसभा निवडणूक 2019: माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर पुण्यातून मैदानात? निष्ठावंतांचे काय होणार?)

करीना कपूर भोपाळच्या सूनबाई

अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाहबद्ध झाल्यावर करीना कपूर पतौडी कुटुंबाशी जोडली गेली आहे. त्यामुळे करीना आता भोपाळची सूनबाई आहे. पती सैफ अली खान याच्यासोबतही करीना अनेकदा भोपाळला आली आहे. हाच धागा पकडत अनेक काँग्रेस आमदारांनी करीनाच्या नावाचा आग्रह धरला आहे.

विधानसभा विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भोपाळचे आमदार गुड्डू चौहान, अमित शर्मा आणि मोनू सक्सेना यांनी पक्षाच्या वरिष्ठांना पत्र लिहून करीनाच्या उमेदवारीबाबत आग्रह धरला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजयाची मुसंडी मारत शिवराज सिंह चौहान यांच्या रुपात गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या सरकारला पराभूत केले होते. या विजयानंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह दिसत आहे.