Bihar Assembly Election 2020 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा देणारा भारतीय जनता पक्ष (BJP) बिहार विधानसभा (Bihar Assembly) निवडणुकीतही हाच फंडा वापरेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी रविवारी घोषणा करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. जे पी नड्डा यांनी जाहीर केले की, भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) आपल्या मित्रपक्षांसोबतच लढेन. त्यामुळे स्पष्ट झाले आहे की, ही निवडणूक भाजप नीतीश कुमार (Nitish Kumar) यांचा जनता दल युनायटेड (JDU), राम विलास पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी (LJP) या मित्रपक्षांसोबत लढणार आहे.

दरम्यान, जनता दल (यु) आणि लोकजनशक्ती पार्टी हे जाहीररीत्या एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसून आले आहेत. मात्र, व्हर्च्युअल पद्धतीने पार पडलेल्या बिहार भाजप कार्यसमितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, जेव्हा भाजप, जनता दल युनायटेड आणि लोकजनशक्ती पार्टी एकत्र आली होती तेव्हा बिहारमध्ये राजग विजयी झाली होती. आताही भाजप, जनता दल (यु) आणि लोजपा मिळून निवडणूक लढवतील आणि विजय मिळवतील.

जे पी नड्डा यांनी पुढे सांगितले की, बिहार आणि इतर ठिकाणी विरोधी पक्ष मृतावस्थेत आहे. त्यांच्या जवळ कोणत्याही प्रकारचा विचार नाही. कोणताही अजेंडा नाही. जनसेवेचा कोणताही संकल्प नाही. त्यामुळे ते पुढे येऊ शकत नाहीत. बिहारच्या लोकांना भाजप आणि राजगवर विश्वास आहे. प्रत्येक बुथवर लक्ष ठेवा. कोणत्याही प्रकारे कार्यकर्त्यांना कमतरता पडू देऊ नका, असेही नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या बैठकीत राज्यातील पक्षनेत्यांना सांगितले. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी सोडली महागठबंधनची साथ)

दरम्यान, नड्डा यानी या वेळी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील जदयू, भाजप सरकार यांनी मिळून बिहारचा विकास केल्याचा दावा केला. विविध केंद्रीय आणि राज्यस्थरीय योजनांबद्दल सांगितले. तसेच कोरना व्हायरस काळात सरकारने डोअर टू डोअर स्क्रिनिंग केले असेही सांगितले.