वर्षा अखेरीस महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार? पाहा काय म्हणाले अजित पवार
Ajit Pawar (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू झाली असून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याले दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (National Congress Party) पक्षाची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्व आमदारांसोबत चर्चा केली. तसेच नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार असा विश्वासही त्यांनी दाखवला आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला रात्री 8.30 वाजेपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपण्याआधीच राज्यात राज्यपालांच्या शिफारशीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर राज्यात सत्ता संघर्ष पाहायला मिळाला आहे. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावून सत्तास्थापन संदर्भात चर्चा केली आहे. मलाही वाटते की नवीन वर्ष सुरु होण्याअगोदर महाराष्ट्रात नवे मिळायला हवे, असे अजित पवार म्हणाले आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार संभाळत आहेत. हे देखील वाचा- शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार नाही; राष्ट्रपती राजवट असली तरी सहा महिन्यात केव्हाही बहुमत सिद्ध करता येऊ शकणार

एएनआयचे ट्विट-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, मुंख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु झाली होती. दरम्यान, भाजपने विरोधी बाकावर बसणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपने असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. परंतु, दोन्हीही पक्ष सत्ता स्थापन करण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.