PM Narendra Modi's Picture on Train Ticket (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर देशात आचारसंहिता लागू आहे. या काळात कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून निवडणूक आयोग काळजी घेत आहे. याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो असलेले तिकीट प्रवाशांना दिल्याप्रकरणी भारतीय रेल्वेकडून दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ही घटना आज, सोमवारी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी (Barabanki) रेल्वे स्टेशनवर घडली. 13 एप्रिल रोजी या तिकिटांचे वाटप करण्यात आले होते, या गोष्टीची निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे.

13 एप्रिल रोजी या स्थानकावर नरेंद्र मोदी यांचा फोटो नसलेल्या रोलवर काही तिकिटे छापण्यात आली. मात्र शिफ्ट संपल्यावर त्या जागी नवीन कर्मचारी आले, त्यावेळी कोणताही रोल उपलब्ध नसल्याने त्यांनी चुकून उपलब्ध असलेल्या, ज्यावर नरेंद्र मोदी यांचा फोटो होता अशा रोलवर तिकिटे छापली. मात्र आदर्श आचारसंहिता लागू असल्याने सरकारी व्यासपीठावरून अशा प्रकारे जाहीरताबाजी करणे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. (हेही वाचा: रेल्वे आणि विमानसेवा कंपनीकडून आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाकडून रेल्वे, उड्डाण मंत्रालयाला कारवाईचे आदेश)

याधीही एअर इंडियाच्या बोर्डिंग पास, तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापल्याने निवडणूक आयोगाने रेल्वे बोर्डचे संचालक आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव यांना पत्र लिहिले होते. अजून एका प्रकरणात भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा भाग असलेल्या 'मैं भी चौकीदार' घोषणा लिहिलेला चहाचा कप रेल्वेत आढळून आला होता. याबाबत रेल्वेला कारणे दाखवा नोटीस  बजावली होती.