PM Narendra Modi (PC - ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 30 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप करतील. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधित करणार आहेत. देशभरात 37 ठिकाणी रोजगार मेळाचे आयोजन होणार आहे. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांच्या विविध विभागांमध्ये भरती होत आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, वित्तीय सेवा विभाग, संरक्षण मंत्रालय,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि कामगार आणि रोजगार मंत्रालय, यासह विविध मंत्रालये/विभागांमधील सरकारी आस्थापनांमध्ये रुजू होतील.

रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळा हा पुढील रोजगार निर्मितीमध्ये वाढ होण्यासाठी सहाय्य करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागी होण्यासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल, अशी अपेक्षा आहे. (हे देखील वाचा: Free Ration- PMGKAY Extended for 5 Years: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेस पाच वर्षांसाठी मुदतवाढ)

नव्याने नियुक्ती झालेले उमेदवार त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि भूमिका- क्षमतांसह, देशाच्या औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या सक्षमीकरणाच्या कार्यात योगदान देतील आणि त्याद्वारे विकसित भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावतील.

नव्याने नियुक्त केलेल्यांना कर्मयोगी प्रारंभ द्वारे आयगाॅट (iGOT) या पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूलवर स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळत आहे, ज्यावर 800 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम ‘कुठेही कोणत्याही साधनावर’ प्रशिक्षणासाठी (लर्निग फॉरमॅट) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.