पीएम  नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; 'एक राष्ट्र एक निवडणूक' मुद्द्यावर होणार चर्चा, कॉंग्रेसचा जोरदार विरोध
Prime Minister Narendra Modi (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 19 जून रोजी सर्व-पक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ (One Nation One Election) या विषयावर विचारविनिमय करण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पंतप्रधान मोदी 20 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभा खासदारांशी संवाद साधतील. योग दिनाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी खासदारांच्या सोबत भोजनाचा कार्यक्रम, दिल्लीतल्या अशोका हॉटेलमध्ये आयोजित केला गेला आहे. पहिल्यापासूनच मोदी सरकारचा ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ हा अजेंडा होता. आता पंतप्रधान मोदींनी या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. तसेच पक्षातील कटुता नष्ट व्हावी हाही यामागील उद्देश आहे.

याआधी, केंद्र सरकारने नवनिर्वाचित लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या एक दिवस आधी म्हणजेच, 16 जून रोजी अखिल-पक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. सरकारने या सत्रात काही महत्वाची विधेयके पास करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी, विरोधी पक्षांना सहकार्य करण्याची मागणी केली आहे. या विधेयकांमध्ये ट्रिपल तलाक बिलही समाविष्ट आहे, जे केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजूर केले.

(हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' चा दिवस ठरला, 30 जूनला जनतेशी संवाद साधणार)

कॉंग्रेस नेहमीच ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ या गोष्टीच्या विरोधात आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कॉंग्रेसने या गोष्टीला जोरदार विरोध केला होता. या प्रकरणात मल्लिकार्जुन खडगे, पी. चिदंबरम आणि इतर कॉंग्रेस नेत्यांनी विधी आयोगाच्या समोर असहमती दर्शवली होती. आता प्रल्हाद जोशी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी सोनिया गांधी आणि गुलाब नबी आझाद यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करुन, संसदेचे सत्र शांततेत पार पाडू देण्याचे आवाहन केले आहे.