Paragliding Safety Regulations: गोव्यात पुण्यातील तरुणीचा आणि एका ऑपरेटरचा मृत्यू झाल्यानंतर पॅराग्लायडिंग (Paragliding) ऑपरेशन्स थांबवण्यात आले आहेत. परंतु, ऑपरेटर्सनी पॅराग्लायडिंग मार्गदर्शक तत्त्वांचे (Paragliding Guidelines) पालन केल्यानंतर त्यास पुन्हा परवानगी दिली जाईल, असं गोवा सरकारने (Goa Government) आज स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील एका महिला पर्यटकासह दोघांच्या मृत्यूनंतर, पर्यटन विभागाने पुढील आदेशापर्यंत संपूर्ण गोव्यात सर्व प्रकारच्या पॅराग्लायडिंगला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.
पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी सांगितलं की, पॅराग्लायडिंग ऑपरेशन्सवर बंदी आहे अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. ती बंदी नाही तर आम्ही सर्व परवानग्यांचा आढावा घेईपर्यंत निलंबन आहे. सध्या, गोव्यात पॅराग्लायडिंग निलंबित करण्यात आले आहे. पर्यटन मंत्र्यांनी सांगितलं की, पॅराग्लायडिंग हा एक खेळ आहे. यासंदर्भातील नियम कठोर असले तरी देखील त्यात अंतर्निहित धोके आहेत. पॅराग्लायडिंग संदर्भात कितीही नियम लावले तरी अशा घटना घडण्याची शक्यता असते. परंतु जर लोक नियमांचे पालन करत नसतील तर आम्ही खेळांना परवानगी देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (हेही वाचा -Goa Paragliding Accident: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणीचा मृत्यू; ऑपरेटरनेही गमावला जीव)
ऑपरेटर्सनी तपासणीसाठी आवश्यक परवानग्या सादर कराव्यात -
खौंटे यांनी यावर भर दिला की, पॅराग्लायडिंग किंवा तत्सम उपक्रम करू इच्छिणाऱ्या ऑपरेटर्सनी तपासणीसाठी आवश्यक परवानग्या सादर कराव्यात. जो कोणी पॅराग्लायडिंग किंवा अशा उपक्रमांची ऑफर देत आहे त्याने येऊन आम्हाला त्यांची आवश्यक परवानगी दाखवावी आणि जर सर्व काही ठीक असेल तर आम्ही नियमन करू आणि परवानगी देऊ. (हेही वाचा - Himachal Pradesh: हिमाचलमध्ये वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात 2 जणांचा मृत्यू, ग्लायडर्स हवेतच आदळले)
दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांबद्दल व्यक्त केला शोक -
दरम्यान, यावेळी पर्यटन मंत्र्यांनी दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला आणि सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता राहील यावर भर दिला. जीवनहानी करणाऱ्या बेकायदेशीर कृतीबद्दल आम्ही तडजोड करणार नाही. गोव्याच्या पर्यटनाच्या हितासाठी आम्ही आवश्यक पावले उचलू, असही खौंटे यांनी म्हटलं आहे. गोव्यातील आमदार मायकल लोबो यांनी गोव्यात पॅराग्लायडिंगवर पूर्णपणे बंदी घालण्यास विरोध दर्शविल्यानंतर आणि त्याऐवजी अधिक कडक सुरक्षा नियमांची मागणी केल्यानंतर पर्यटन मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.