Goa Paragliding Accident: गोव्यातून (Goa) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी पॅराग्लायडिंग (Paragliding) करणाऱ्या पुण्यातील एका तरुणीचा आणि पॅराग्लायडर ऑपरेटरचा मृत्यू झाला. केरी पठारावर पॅराग्लायडिंग करताना दोरी तुटल्याने ही दुर्घटना घडली. गोवा पोलिसांनी पॅराग्लायडिंग कंपनीच्या मालकाविरुद्ध कथित सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, पॅराग्लायडिंग अपघातात मृत्यू झालेली तरुणी पुण्यातील असून पॅराग्लायडर ऑपरेटर नेपाळचा होता.
पुण्यातील तरुणीचा पॅराग्लायडिंग अपघातात मृत्यू -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी 4.30 ते 5 च्या दरम्यान घडली. गोवा पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून तरुणीचे नाव शिवानी डबले (वय, 27) आणि ऑपरेटर सुमन नेपाली (वय, 26) अशी त्यांची नावे आहेत. शिवानी डबले आपल्या मैत्रिणीसोबत गोव्याला फिरायला आली होती. (हेही वाचा - Himachal Pradesh: हिमाचलमध्ये वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात 2 जणांचा मृत्यू, ग्लायडर्स हवेतच आदळले)
कसा घडला अपघात?
पॅराग्लायडरने केरी पठारावरून तरुणीला घेऊन उड्डाण केले होते आणि ते कमी उंचीवर उडत होते. मात्र, दुर्दैवाने पॅराग्लायडर्सचा एक दोर तुटला आणि ते वेगवेगळ्या खडकांवर आदळले. या अपघातात तरुणी तसेच ऑपरेटर गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये तरुणीचा आणि ऑपरेटरचा मृतदेह ठेवण्यात आले आहे.
STORY | Woman tourist, instructor killed in paragliding accident in North Goa
READ: https://t.co/LOOoIFAVbm pic.twitter.com/0wzCFUFeds
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2025
केरी पठार पॅराग्लायडिंगसाठी धोकादायक -
दरम्यान, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की, केरी पठार हा धोकादायक भाग असल्याने त्यावर पॅराग्लायडिंग उपक्रम थांबवण्यासाठी त्यांनी पर्यटन विभागाला पत्र लिहिले आहे. केरी पंचायतीनेही पॅराग्लायडिंग उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पठारावर चार पॅराग्लायडिंग ऑपरेटर आहेत.
कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल -
तथापी, पोलिस अधीक्षक (एसपी) टिकम सिंह वर्मा यांनी सांगितले की, हाइक 'एन' फ्लाय कंपनीचे मालक शेखर रायजादा यांच्याविरुद्ध मांद्रेम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योग्य अधिकाऱ्यांची परवानगी न घेता त्याने जाणूनबुजून त्याच्या पॅराग्लायडर पायलटला पर्यटकांसोबत पॅराग्लायडिंग करण्याची परवानगी दिली. याप्रकरणी मांद्रेम पोलिसांनी कलम 105 बीएनएस (हत्या न करता सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.