चीनमध्ये जन्मलेला कोरोनाने (Coronavirus) भारतात हाहाकार माजवला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, अहमदाबाद (Ahmedabad) येथील एका नर्स महिलेला कोरोनाची लागण होताच तिच्या सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हेतर, या महिलेला पुन्हा घरात घेण्यासाठी तिच्या नवऱ्याने तिच्याकडे तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने नवऱ्यासह तिच्या सासरच्या लोकांविरोधात खोखरा पोलीस ठाण्यात (Khokhra Police Station) तक्रार दाखल केली आहे. कोव्हिड योद्ध्यासोबत घडलेला प्रकार धक्कादायक असून यावर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे.
पीडित महिला ही अहमदाबादच्या इसनपूर परिसरातील रहिवाशी आहे. तिचे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात खोखरा येथील एका तरूणाशी विवाह झाला होता. पीडिता मणिनगर येथील एलजी रुग्णालयात नोकरी करते. परंतु, तिच्या सासरच्या लोकांना तिचे काम आवडत नव्हते. त्यानंतर एप्रिल महिन्यात तिला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तिच्या नवऱ्यासह सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढले. एवढेच नव्हेतर, तिला पुन्हा घरात घेण्यासाठी तिच्याकडे 10 लाखांची मागणी केली. पैसे नाही दिल्यास सोडचिट्ठी देण्याची धमकी दिली. पीडित गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरीच आहे. दरम्यान, पीडित महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्या लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रकरण न मिटल्याने पीडिताने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे देखील वाचा- Madhya Pradesh: ग्वाल्हेरमध्ये बस आणि ऑटोची जोरदार धडक; अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू
समाजात वावरत असताना अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार, मानसिक त्रास, विनयभंग, पिळवणूक अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. मात्र, तरीही महिलांवरील अत्याचारांच्या संख्येत होणारी वाढ कायम आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.