Coronavirus Vaccine: लसीच्या कमतरतेवर नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 1 ऐवजी 10 कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्या
Nitin Gadkari (Photo Credits: ANI)

Coronavirus Vaccine: देशात लसीची कमतरता भासल्यास इतर कंपन्यांना लस तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या व्यतिरिक्त जास्तीत-जास्त कंपन्यांना जीवनरक्षक औषधांना परवाना देण्यात यावा. ऑक्सिजनच्या अभावामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. या रुग्णांच्या अंत्यसंस्कारांचे चांगले व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. लसीची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनचं बर्‍याच कंपन्यांनी लसी तयार कराव्यात. यासाठी लसीचे मूळ पालक असलेल्या कंपनीला इतर कंपन्यांनी दहा टक्के रॉयल्टी दिली पाहिजे.

नितीन गडकरी म्हणाले की, अधिक कंपन्या लस तयार करण्यात गुंतल्या गेल्या तर आपल्या देशाची मागणी पूर्ण होऊ शकते. एकदा देशातील मागणी पूर्ण झाली आणि उत्पादन अधिशेष झाले, तरचं त्याची विदेशात निर्यात होऊ शकते. गडकरी हे विद्यापीठाच्या कुलगुरूंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते. (वाचा - Corona Vaccination: अदर पूनावाला म्हणतात 'देशातील जनतेकडे सीरम इंस्टीट्यूटचे दुर्लक्ष नाही, भारतासारख्या देशात 2-3 महिन्यांत कोरोना लसीकरण अशक्य')

या महिन्यात 7.30 कोटी लस उपलब्ध

गडकरी म्हणाले की, देशातील प्रत्येक राज्यात दोन-तीन प्रयोगशाळा आहेत. त्यांना लस तयार करण्याचं काम देण्यात याव. केवळ सेवेच्या उद्देशाने नव्हे तर 10 टक्के रॉयल्टीच्या आधारे. हे काम 15-20 दिवसात करता येईल. गेल्या गुरुवारी सरकारने लस व्यवस्थापनाविषयी सांगितले होते की, मे महिन्यात देशातील लोकांसाठी 7.30 कोटी लस उपलब्ध आहेत. यापैकी 1.27 कोटी डोस राज्य सरकार थेट खरेदी करीत आहेत, तर 80 लाख डोस खासगी रुग्णालयांकडून खरेदी करण्यात येत आहेत.

अंत्यसंस्कारांची योग्य व्यवस्था

कोरोनामुळे निधन होणाऱ्या मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचे योग्य व्यवस्थापन केले जावे. स्मशानभूमीत डिझेल, इथेनॉल, बायोगॅस आणि वीजेचा वापर करून कमी खर्च होऊ शकते. बिहार आणि उत्तर प्रदेशमधील अनेक मृतदेह गंगेमध्ये वाहून गेल्याने अत्यसंस्काराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.