Zomato, Swiggy Hikes Platform Fee: देशातील दोन प्रमुख फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आणि स्विगीने (Zomato and Swiggy) त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जर तुम्ही या दोन्ही फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता या प्लॅटफॉर्मवरून खाद्यपदार्थ मागवणे महागडे ठरणार आहे. इथल्या पदार्थांसाठी तुम्हाला अतिरिक्त किंमत मोजावी लागणार आहे. स्विगी आणि झोमॅटोने त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे.
स्विगी आणि झोमॅटोने त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या वाढीनंतर, बेंगळुरू आणि दिल्लीसारख्या बाजारपेठेतील ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर 6 रुपये अधिक प्लॅटफॉर्म फी भरावी लागेल. गेल्या वर्षीच, या दोन्ही खाद्य वितरण कंपन्यांनी प्लॅटफॉर्म शुल्क लागू करण्यास सुरुवात केली होती, जे पूर्वी प्रति ऑर्डर 2 रुपये होते.
झोमॅटो आणि स्विगी या दोन्ही फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने त्यांच्या कंपन्यांचा एकूण महसूल आणि नफा वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्म फी लागू करण्यास सुरुवात केली. जानेवारी महिन्यात, स्विगीने त्यांच्या काही निवडक वापरकर्त्यांसाठी 10 रुपये प्लॅटफॉर्म फी ठेवली होती, जी सध्या इतर वापरकर्त्यांकडून आकारल्या जाणाऱ्या 3 रुपयांच्या शुल्कापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. मात्र, कोणत्याही वापरकर्त्याकडून 10 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क वसूल करण्यात आले नाही. त्याला फक्त जास्त प्लॅटफॉर्म फी दाखवण्यात आली होती, अंतिम पेमेंटच्या वेळी त्याच्याकडून फक्त 5 रुपये घेतले जात होते. (हेही वाचा: India Post GDS Recruitment 2024: भारतीय पोस्ट विभागात 44,000 हून अधिक जागांसाठी बंपर भरती; 18-40 वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज)
आता स्विगी आणि झोमॅटोने प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केल्याने ग्राहक निराश झाले आहेत. कॅपिटल माइंडचे सीईओ दीपक शेनॉय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर झोमॅटो आणि स्विगीबद्दल पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'झोमॅटो आणि स्विगीने लागू केलेल्या प्लॅटफॉर्म शुल्कामुळे ग्राहकांना त्रास होणार आहे. याच कारणामुळे मी आता स्विगी आणि झोमॅटोपासून दूर राहायला लागलो आहे.' या कंपन्या प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांकडून 6 रुपये घेत असल्याचेही त्यांनी लिहिले आहे. याशिवाय, या दोन्ही कंपन्या रेस्टॉरंट्सकडून 30 टक्के हिस्सा घेतात.