येस बँकेचे (Yes Bank) सीईओ राणा कपूर (Rana Kapoor) यांना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी विकलेली पेटींग ईडी (ED) कडून सील करण्यात आली आहे. राजीव गांधी यांची ही पेटींग्स राणा कपूर यांनी प्रियंका गांधींकडून तब्बल 2 कोटी रुपयांना खरेदी केली होती. ही पेटींग्स खरेदी करण्यासाठी माझ्यावर काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी दबाव टाकला होता, अशी माहिती राणा कपूर यांनी मुंबईच्या ईडी ऑफिसमध्ये दिली. जप्त करण्यात आलेली पेटींग्स सध्या ईडी कार्यालयात आहेत.
जून 2010 मध्ये प्रियंका गांधी यांनी राणा कपूर यांना लिहिलेल्या पत्रात 2 कोटींना पेटींग्सची विक्री केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच या पत्रात राणा कपूर यांचे आभारही मान्यात आले आहेत. पेटींग्स विकून आलेल्या 2 कोटी रुपयांतून प्रियंका गांधी यांनी शिमला येथे कॉटेज खरेदी केले होते. त्यामुळे या सर्व प्रकरणात प्रियंका गांधी आणि मिलिंद देवरा यांचीही चौकशी होऊ शकते, असे सुत्रांचे म्हणणे आहे. (Yes Bank Crisis: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची 11 मार्च पर्यंत ED च्या तुरुंगात रवानगी, पीएमएल कोर्टाने सुनावला निर्णय)
या सर्व प्रकरणावर पेटींग्स विकण्यात गैर काय आहे, असा प्रश्न काँग्रेस पक्ष उपस्थित करत आहे. प्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसैन यांनी राजीव गांधी यांचे चित्र काढले होते. ते पेटींग प्रियंका गांधी यांनी राणा कपूर यांना विकले. तर त्यात गैर काय असा प्रश्न काँग्रेस विचारत आहे. तसंच प्रियंका यांनी पेटींगमधून मिळालेल्या रक्कमेचा इनकम टॅक्स रिटर्न्स देखील फाईल केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, पेटींग्सची रक्कम चेकद्वारे देण्यात आली होती. तसंच त्याचा टॅक्सही भरण्यात आला होता.
येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली रविवारी अटक केली. सुमारे 20 तास त्यांची चौकशी झाल्यानंतर 11 मार्चपर्यंत ईडी कस्टडीत ठेवण्यात येणार आहे. तसंच सोमवारी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी केली. तसंच त्यांना देश सोडून जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.