बिहारमधील (Bihar) वैशाली जिल्ह्यातील लालगंज अततुल्लापूर येथील एका माध्यमिक शाळेत माध्यान्ह भोजनात (Mid-Day Meal) अळी सापडल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी याची माहिती मुख्याध्यापक मोहम्मद मिसवद्दीन यांना दिली असता त्यांनी त्यावर, यामध्ये जीवनसत्त्वे असतात, ते चुपचाप खा असे सांगितले. परंतु असे कीटक असलेले माध्यान्ह भोजन खाण्यास नकार दिल्याने मुख्याध्यापक विद्यार्थ्याचा हात तोडला.
या घटनेनंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाने तपास सुरू केला आहे. शनिवारी (12 नोव्हेंबर 2022) अततुल्लापूर येथील मिडल स्कूलमध्ये मुलांना माध्यान्ह भोजन देण्यात आले. जेवणात भात होता. विद्यार्थ्यांनी जेवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना भातामध्ये अळी असल्याचे दिसले. यानंतर विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक मोहम्मद मिसवद्दीन यांच्याकडे तक्रार केली.
परंतु कीटकांमध्ये जीवनसत्त्वे असतात, ते चुपचाप खा असे प्राचार्य मोहम्मद मिसवद्दीन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांनी जेवण घेण्यास स्पष्ट नकार दिला. यावर मुख्याध्यापकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मिसवद्दीनने एका विद्यार्थ्याला एवढे जोरात मारले की, त्या विद्यार्थ्याचा हात तुटला. ही बाब नातेवाइकांना समजताच त्यांनी शाळेत येऊन गोंधळ घातला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार शिक्षण विभागाकडे केली. (हेही वाचा: निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने आप नेते Haseeb-ul-Hasan चढले टॉवरवर; पक्षावर केले गंभीर आरोप (Watch)
तक्रार आल्यानंतर शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक शाळेत पाठवले आहे. शिक्षणाधिकारी परशुराम सिंह यांनी शाळेत पोहोचून मुलांशी बोलून विद्यार्थ्याच्या तुटलेल्या हाताचा वैद्यकीय अहवाल पाहिला. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांवरील अत्याचाराचा आरोप खरा ठरल्यास मुख्याध्यापकांवर कडक कारवाई केली जाईल. दरम्यान, बिहारमध्ये मध्यान्ह भोजनाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. नुकतेच भागलपूरमध्ये 200 हून अधिक मुले माध्यान्ह भोजन खाल्ल्याने आजारी पडली होती.