दिल्ली महानगरपालिका (DMC) निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यानंतर आम आदमी पक्षाचे (AAP) नेते हसीब उल हसन (Haseeb-ul-Hasan) हे हाय टेंशन लाइन टॉवरवर चढले. हसीब यांनी पक्षाच्या नेत्यांवर फसवणूक करून तीन कोटी रुपयांना तिकीट विकल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण 'ड्रामा'चा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हसीब उल हसन हे आम आदमी पार्टीचे माजी नामनिर्देशित नगरसेवक आहेत.
पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे नाराज होऊन हसीब दिल्लीच्या शास्त्री पार्क मेट्रो स्टेशनजवळील ट्रान्समिशन टॉवरवर चढले. पक्षश्रेष्ठींनी आपल्याला तिकीटाचे आश्वासन दिले मात्र ऐनवेळी ते नाकारल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी हसीब म्हणाले, ‘आज मला काही झाले तर माझ्या मृत्यूला दुर्गेश पाठक आणि आम आदमी पार्टीचे आतिशी मार्लेना जबाबदार असतील. या लोकांनी माझी कागदपत्रे आणि पासबुकही गोळा केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मी वारंवार विनंती करूनही पक्ष पेपर परत देत नाही. तिकीट द्यायचे नसेल तर देऊ नका, पण कागदपत्रे परत करा.’
#BREAKING | Former AAP councillor Haseeb-ul-Hasan speaks to media after climbing a tower following denial of ticket to contest for Delhi MCD polls. He alleges corruption in handing out of tickets. Tune in #LIVE: https://t.co/GAtGCw2GdU pic.twitter.com/LP8uwA0IuC
— Republic (@republic) November 13, 2022
'आप'चे नेते टॉवरवर चढल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. सोबतच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते. पोलीस आणि स्थानिक लोकांची समजूत घालूनही ते उतरण्याचे नाव घेत नव्हते. मात्र, यानंतर पोलिसांनी त्यांची कागदपत्र परत केल्यानंतर ते खाली आले. टॉवरवरून खाली उतरल्यानंतर हसीब उल हसन यांनी आरोप केला आहे की, त्याच्याकडे तिकीटासाठी 3 कोटी रुपये मागितले गेले होते, जे त्यांच्याकडे नव्हते व म्हणूनच त्यांना तिकीट देण्यात आले नाही. (हेही वाचा: तुम्ही तुमचं निवडणुक ओळखपत्र आधारकार्डला लिंक केलं का? जाणून घ्या सविस्तर प्रक्रीया)
माफियांकडून तीन कोटी रुपये घेऊन त्यांना तिकीट विकण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हसीब उल हसन यांचा असा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, मार्चमध्ये त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये ते नाल्यात उतरून साफसफाई करताना दिसत होते. जेव्हा ते नाला साफ करून बाहेर आले तेव्हा लोकांनी त्यांना दुधाने आंघोळ घातली.