World's Longest Song: तब्बल 138 तास, 41 मिनिटे, 2 सेकंद गायलेले श्री रामचरितमानस ठरले जगातील सर्वात मोठे गाणे; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Ramcharitmanas (संग्रहित संपादित प्रतिमा)

एकीकडे श्री रामचरितमानसावरून (Ramcharitmanas) राजकीय वर्तुळात वाद सुरू असतानाच, दुसरीकडे धार्मिक नगरी काशीत राहणारे केरळचे जगदीश पिल्लई यांनी रामचरितमानस गाऊन विश्वविक्रम (World Records) केला आहे. श्री रामचरितमानसला जागतिक पातळीवर एक नवी ओळख मिळाली आहे. रामचरितमानसने मैलाचा दगड गाठून जगातील सर्वात मोठे गाणे म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नाव नोंदवले आहे.

डॉ. जगदीश पिल्लई यांनी 138 तास, 41 मिनिटे आणि दोन सेकंदात श्री रामचरितमानस गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. या यशानंतर, रामचरितमानसची अधिकृतपणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठे गाणे म्हणून नोंद झाली आहे.

जगदीश पिल्लई यांचे अभिनंदन करण्यासाठी खुद्द यूपी सरकारमधील मंत्री दया शंकर मिश्राही पोहोचले, ज्यांनी स्वतः राम चरितमानसमधील हे गाणे ऐकले. डॉ जगदीश पिल्लई हे वाराणसीतील लेखक आणि संशोधक आहेत. याआधीही त्यांनी इतर प्रकारांमध्ये विक्रम केले आहेत. पण यावेळच्या त्यांच्या रेकॉर्डची खूप चर्चा होत आहे. या वेळी अखंड 138 तास 41 मिनिटे 2 सेकंद चालणाऱ्या रामचरितमानस या गीताचे ऑडिओ पठण करण्यात आले. हे जगातील सर्वात लांब गाणे बनले आहे, ज्यावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही शिक्कामोर्तब केले आहे. (हेही वाचा: Ram Mandir: राम मंदिराचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार; राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची माहिती)

यापूर्वी हा रेकॉर्ड इंग्लंडच्या म्युझिक बँडच्या नावावर होता. मार्क क्रिस्टोफर ली आणि द पॉकेट गॉड्स यांनी 115 तास 45 मिनिट गाणे गायले होते. आता डॉ. पिल्लई यांनी तो विक्रम मोडला आहे. जगदीश पिल्लई यांनी इंस्ट्रुमेंटल म्युझिक वाजवून श्री रामचरितमानस संपूर्ण पुस्तक, 138 तास, 41 मिनिटे आणि दोन सेकंदांचे गाणे गाऊन कथन केले. Apple Music, Spotify, Amazon Music यांसारख्या अनेक म्युझिक प्लॅटफॉर्मवर ते प्रवाहित करण्यात आले. आता या अधिकृतपणे प्रसिद्ध केलेल्या गाण्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जगातील सर्वात लांब गाणे म्हणून मान्यता दिली आहे.

दरम्यान, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून या गाण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग 20 मे 2019 रोजी सुरू झाले. परंतु कोविड-19 महामारीमुळे रेकॉर्डिंग एका वर्षाहून अधिक काळ थांबवण्यात आले. त्यानंतर शूटिंग पुन्हा सुरू झाले आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी रेकॉर्डिंग पूर्ण झाले. या 138 तास, 41 मिनिटे आणि दोन सेकंदांच्या गाण्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेला, ज्यामध्ये रेकॉर्डिंग, एडिटिंग आणि मिक्सिंग समाविष्ट होते, एकूण चार वर्षे, 63 दिवस आणि 295 तास लागले.