World’s Fastest Human Calculator: हैद्राबादच्या 'नीलकंठ भानु प्रकाश'ने जिंकले सर्वात वेगवान मानवी कॅल्क्युलेटरचे विजेतेपद; शकुंतला देवींचा रेकॉर्ड मोडल्याचा दावा
Neelakanta Bhanu Prakash (Photo Crredits: ANI)

सहसा लोक गणिताचे प्रश्न सोडविण्यासाठी किंवा मोठी गणती करण्यासाठी कॅल्क्युलेटरचा (Calculator) वापर करतात. परंतु असे काही लोक आहेत जे कॅलक्युलेटरशिवाय गणिताचे प्रश्न सोडवू शकतात. असाच एक मुलगा हैदराबादचा (Hyderabad) नीलकंठ भानु प्रकाश (Neelakanta Bhanu Prakash). नीलकंठने नुकतेच जगातील सर्वात वेगवान मानवी कॅल्क्युलेटरचे (Fastest Human Calculator) विजेतेपद जिंकले आहे. लंडनमध्ये नुकतेच माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड 2020 चे आयोजन करण्यात आले होते. यात नीलकंठ भानु प्रकाशने प्रथम स्थान पटकावून भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. लंडनमध्ये झालेल्या या स्पर्धेत 13 देशांनी भाग घेतला होता. नीलकंठ भानू प्रकाशने दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी संपादन केली आहे.

नीलकंठचा असा दावा आहे की, मेंटल कॅल्क्युलेशन्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. नीलकंठच्या म्हणण्यानुसार त्याने स्कॉट फ्लेन्सबर्ग आणि शकुंतला देवी यांचे रेकॉर्डही मोडले आहेत. नीलकंठ भानू प्रकाश  मुलांना ऑनलाइन वर्गातून शिकवण्याचेही काम करतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला गणिताची प्रयोगशाळा तयार करायची आहे व या माध्यमातून त्याला हजारो मुलांपर्यंत पोहोचायचे आहे.

भारतातील सरकारी शाळेत शिकणार्‍या प्रत्येक 4 पैकी 3 मुलां गणित विषय समजण्यास अडचण येते, त्यामुळे नीलकंठला गणिताच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मुलांना गणिताचे शिक्षण देऊन त्यांचे गणितप्रती प्रेम वाढवायचे आहे. दरम्यान, एमएसओ ही 1997 पासून लंडनमध्ये दरवर्षी होणारी मेंटल स्किल आणि माइंड स्पोर्ट्सची सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. एमएसओतर्फे भारतीय स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट 2020 रोजी मेंटल कॅल्क्युलेशन्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2020 आयोजित केली गेली होती.

या स्पर्धेत 57 वर्षांपर्यंतच्या 13 देशांमधील 29 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेतील अनेक फेऱ्यानंतर नीलकंठ भानूने अंतिम सामन्यात 65 गुणांच्या फरकाने विजय मिळविला.