Work From Office: कोरोना महामारीच्या काळात जगभरातील लोकांनी घराबाहेर पडण्याऐवजी घरातूनच काम (Work From Home) केले. वाढत्या विषाणूच्या प्रसारामुळे कार्यालयांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी लागली. त्या काळात घरून काम करण्याचा ट्रेंड वाढला आणि लोकांना त्याचा फायदाही झाला. इतक्या दिवसांनंतरही अशा अनेक कंपन्या आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय देत आहेत. परंतु दीर्घकाळ घरून काम केल्याने लोकांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, मानसिक आरोग्य राखण्यासाठी घरातून काम करण्यापेक्षा ऑफिसमधून काम करणे चांगले आहे.
जागतिक स्तरावर केलेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, भारतातील कार्यालयात काम करणाऱ्यांचे मानसिक आरोग्य हे घरून काम करणाऱ्यांपेक्षा चांगले आहे. युरोप-अमेरिकेप्रमाणे भारतातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मानसिक शांती मिळते. भारतामध्ये ऑफिसमधून काम करणारे लोक घरातून किंवा हायब्रीड वातावरणात काम करणाऱ्यांपेक्षा कमी तणावग्रस्त राहतात.
दुसरीकडे, युरोप आणि अमेरिकेबद्दल बोलताना या अभ्यासात असे म्हटले आहे की, या ठिकाणी हायब्रीड वातावरणात काम करणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य चांगले राहते किंवा सुधारते. हा अभ्यास अमेरिकेतील सेपियन्स लॅबमधील वर्क कल्चर अँड मेंटल वेलबीइंगने केला आहे. या अभ्यासाअंतर्गत सुमारे 55 हजार कर्मचाऱ्यांचा या संशोधनात समावेश करण्यात आला. यामध्ये आढळले आहे की, एका टीममध्ये काम करणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य एकट्याने काम करणाऱ्यांपेक्षा चांगले असते. (हेही वाचा: Jobs in iPhone Maker Apple: ॲपलमध्ये काम करण्याची संधी; बेंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमधील स्टोअरसाठी होत आहे 400 जणांची नोकरभरती)
अहवालात म्हटले आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचे काम करत असलात तरी, तुमच्या सहकाऱ्यांसोबतचे संबंध आणि तुमच्या कामाचा अभिमान आणि हेतू यांचा तुमच्या मानसिक आरोग्यावर सर्वात मोठा प्रभाव पडतो.’ या अभ्यासात मानसिक आरोग्य गुणांक नावाचा दृष्टिकोन वापरला गेला, जो मानसिक भावना आणि कार्यप्रणालीच्या 47 पैलूंचे मूल्यांकन करतो जे एकूण मानसिक आरोग्य स्कोअरमध्ये एकत्रित केले जातात.