धक्कादायक! महिला तहसीलदार विजया रेड्डी यांना कार्यालयात घुसून जिवंत जाळले
Tahsildar Vijaya Reddy | (Photo Credits: ANI)

एका महिला तहसीलदारास कार्यालयात घुसून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे राज्य अशी ओळख असलेल्या तेलंगणामध्ये घडली. विजया रेड्डी ( Tahsildar Vijaya Reddy) असे महिला तहसीलदाराचे नाव असून, त्या रंगा रेड्डी (Ranga Reddy) जिल्ह्यातील अब्दुल्लापुर येथे कर्तव्यावर होत्या. तहसीलदार मॅडमना भेटायचे आहे असे सांगून एक व्यक्ती विजया रेड्डी यांच्या कार्यालयात (Tahsil Office) गेला. कार्यालयात प्रवेश करताच सदर व्यक्तीने सोबत आणलेला ज्वलनशील पदार्थ (पेट्रोल) विजया रेड्डी यांच्या अंगावर ओतले आणि त्यांना आगीच्या भक्षस्थानी देऊन तो पसार झाला.

प्राप्त माहितीनुसार, विजया रेड्डी यांचा घटनास्थळीच भाजून मृत्यू झाला. दरम्यान, तहसीलदार विजया रेड्डी यांचे प्राण वाचविण्यासाठी धावलेले दोन कर्मचारीही या घटनेत गंभीर भाजले आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या दोघांतील एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास सुरु केला आहे. मात्र, आरोपी अद्याप सापडला नाही.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार विजया रेड्डी या कार्यालयातील आपल्या दालनात बसल्या होत्या. दरम्यान, एक व्यक्तिने कार्यालयात प्रवेश केला आणि त्यांच्यावर पेट्रोल फेकले. त्याचा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्यास पकडण्यास धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याने आग लाऊन पळ काढला. (हेही वाचा, श्रीनगर येथे लाल चौकाजवळ ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी)

एएनआय ट्विट

या प्रकारानंतर उपस्थित नागरिक आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तहसीलदार विजया यांना मृत घोषीत केले. तर इतर दोघांवर उपचार सुरु आहे. त्यातील एकाच्या जीवावरील धोका टळल्याचे सांगितले जात आहे.