Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील प्रयागराजमधील (Prayagraj) एअरप्लेन क्रॉसिंगजवळील कोचिंग सेंटरच्या इमारतीवरून कथितपणे उडी (Woman Jumps From Building) मारल्याने एका 22 वर्षीय महिलेचा मृत्यू (Woman Death) झाला आहे. ही घटना मंगळवारी (22 ऑगस्ट) घडली. पोलिसांनी सांगितले की, तिच्या कथित प्रियकराशी झालेल्या भांडणानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. स्पर्धा परीक्षेची (Competitive Exams) तयारी करणारी ही महिला अल्लापूर परिसरात राहात होती. शरीरावर गंभीर जखमा आणि मार लागल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिस उपचारापूर्वीच मृत घोषीत केले.

वडिलांकडून विनयभंगाचा आरोप

महिलेच्या वडिलांनी सौरभ सिंग नामक व्यक्ती आणि इतर तीन पुरुषांवर कोचिंग सेंटरमध्ये तिचा विनयभंग केल्याचा आणि तिला कॉरिडॉरमधून उडी मारण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी असाही दावा केला आहे की, ही महिला प्रयागराज येथील युनिव्हर्सिटी रोडवर पुस्तक खरेदी करण्यासाठी मंगळवारी गेली होती. तेव्हा सौरभ सिंहने तिच्याशी पाटलाग केला, तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो जमिनीवर फेकला आणि फोडला. सौरभ आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (हेही वाचा- एकतर्फी प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा! मुलीच्या मानेवर कात्रीने वार, वर्धा जिल्ह्यातील घटना)

पीडितेचे संशयित तरुणाशी प्रेमसंबंध?

कर्नलगंजचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव कुमार यादव यांनी मात्र, महिला आणि सौरभचे प्रेमसंबंध असल्याचे सांगत प्रकरणाला वेगळे वळण दिले. त्यांनी म्हटले की, ही प्रियकर आणि महिला या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. भांडणाचे कारण महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी असलेल्या कथित संबंध हे होते. सुरुवातीला किरोळ वादातून सुरु झालेल्या भांडणाचे पर्यावसन हिंसेत झाले.

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, महिलेचा कथीत प्रियकर सौरभ यास कोणीतरी सांगितले होते की, त्याची प्रेयसी (पीडित मुलगी) दुसऱ्या व्यक्तीला डेट करत आहे. मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी सौरभने मंगळवारी सकाळी त्या मुलीला एअरप्लेन स्क्वेअर येथे भेटण्यास बोलावले. जिथे त्यांच्यात कथीत संबंधांवरुन वाद झाला. वाद टोकाला गेला. त्यातून पीडितेने हे कृत्य केले.

दरम्यान, पोलिसांनी खराब झालेला मोबाईल जप्त केला असून, याप्रकरणी सौरभ सिंगला अटक केली आहे. महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे. वडिलांनी केलेले आरोप आणि घटनास्थळावरील परिस्थिती यांचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. सौरभला मदत करणारे आणखी तिघे कोण आहेत, याचाही शोध घेतला जात आहे.