![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/Husband-Wife-ac-380x214.jpg)
अलीगडमध्ये (Aligarh) घटस्फोटाचे (Divorce) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या वतीने कौटुंबिक न्यायालयात अजब अर्ज दाखल करण्यात आला आहे. महिलेने तिच्या पतीवर मेकअपसाठी (Makeup) पैसे न दिल्याचा आरोप केला आहे. यामुळेच पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी महिलेने हा अर्ज दाखल केला आहे.
तिने अर्जात लिहिले आहे की, ती मेकअपसाठी पतीकडे वारंवार पैसे मागत होती, मात्र पतीने तिला पैसे दिले नाहीत. त्यामुळे आता तिला पतीपासून घटस्फोट हवा आहे. याआधी समुपदेशकाकडून महिलेची समजूत काढण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले, मात्र महिला पतीला घटस्फोट देण्यावर ठाम आहे. माहितीनुसार, 2015 मध्ये महिलेचा विवाह एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाशी झाला होता.
या जोडप्याला आजतागायत अपत्य नाही. महिलेचा आरोप आहे की, घराच्या इतर आवश्यक खर्चासाठी तसेच मेकअपसाठी पती तिला पैसे देत नाही. पती सतत तिचा अपमान करतो आणि ती आपल्यासोबत राहण्यास लायक नसल्याचे टोमणे मारतो. एवढेच नाही तर एके दिवशी पती आणि सासूने तिला रात्री उशिरा घरातून हाकलून दिले होते. याविषयी तिने आपल्या पालकांशी चर्चा केली होती मात्र त्यांची अपेक्षित मदत होऊ शकली नाही. (हेही वाचा: Gujarat: बॉयफ्रेंड फिरायला उत्तराखंडला गेल्याने त्याच्याऐवजी गर्लफ्रेंड पोहोचली परीक्षा द्यायला; 'असा' झाला भांडाफोड)
पीडितेने सांगितले की, लग्नानंतर तिने बहिणीकडून पैसे घेऊन एक ऑपरेशन केले होते, पण पतीने ते पैसेही परत केले नाहीत. हे प्रकरण अद्याप न्यायालयात विचाराधीन आहे आणि आतापर्यंत झालेल्या दोन सुनावणींमध्ये न्यायालयाने पती-पत्नीमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याला यश आले नाही. कौटुंबिक न्यायालयात नियुक्त समुपदेशक योगेश सारस्वत यांनी सांगितले की, समुपदेशनादरम्यान दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पत्नीला पतीसोबत राहायचे नाही आणि तिला पतीपासून घटस्फोट हवा असा तिचा आग्रह आहे.