एका घटस्फोटाच्या खटल्याची (Divorce Case) सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) नुकत्याच दिलेल्या निकालात, एखाद्याच्या सावळ्या त्वचेवर वांशिक टिप्पणी करणे ही एक प्रकारची 'क्रूरता' असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणामध्ये पती सावळ्या रंगाचा असल्याने त्याची पत्नी त्याला टोमणे मारत त्याचा मानसिक छळ करत होती. आधी पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिथे त्यांचा घटस्फोट मंजूर झाला नाही. त्यानंतर पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली.
कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट न देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पतीने उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली होती. उपविभागीय खंडपीठाने नमूद केले की, पत्नीने पतीला त्याच्या सावळ्या रंगामुळे सतत अपमानित केले आहे आणि त्याच्या त्वचेच्या रंगावरून चिडवून त्याचा मानसिक छळ केला आहे.
खंडपीठाने पुढे म्हटले की, आपले हे वागणे लपवण्यासाठी पत्नीने पतीवर बेकायदेशीर संबंधाचा आरोपही केला. याला निःसंशयपणे क्रूरता मानली जाईल. त्यानंतर न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला व जोडप्याला घटस्फोट दिला.
माहितीनुसार, या जोडप्याने 2007 मध्ये लग्न केले होते, परंतु पतीने 2012 मध्ये घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. पुढे न्यायालयाने 13 जानेवारी 2017 रोजी पतीची याचिका फेटाळली होती. याचिकाकर्त्याने दावा केला की, लग्नानंतर त्याच्या पत्नीने नेहमीच त्याला 'काळी व्यक्ती' म्हणून टोमणे मारले आहे आणि त्याच्या त्वचेच्या रंगावरून त्याला अपमानित केले आहे. या जोडप्याला एक मुलगी असल्याने फक्त आपल्या मुलीसाठी पती सर्व काही सहन करत राहिला.
या व्यक्तीच्या पत्नीने 2011 मध्ये त्याची वृद्ध आई आणि कुटुंबातील सदस्यांविरुद्ध तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात त्यांच्यावर अनेक आरोप व अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी व्यक्तीने 10 दिवस पोलीस स्टेशनमध्येही काढले होते. पतीने पुढे दावा केला की, त्याची पत्नी आपल्या आई-वडिलांकडे गेली मात्र ती परत आलीच नाही. पत्नीने पतीच्या बॉसकडेही त्याची तक्रार केली होती.
या दरम्यान त्याला खूप त्रास सहन करावा लागला. तो डिप्रेशनमध्येही गेला होता. त्यानंतर त्याने कोर्टात धाव घेऊन घटस्फोटाची याचिका दाखल केली. मात्र पत्नीने ही याचिका रद्द करण्याची विनंती केली आणि दावा केला की, तिच्या पतीचे बाहेर प्रेमसंबंध होते आणि प्रेमसंबंधातून एक मूलही जन्माला आले आहे. (हेही वाचा: Allahabad High Court ने बलात्कार प्रकरणी खोटी FIR करणार्या महिलेला बजावला 10 हजारांचा दंड)
आता खंडपीठाने पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात केलेल्या फौजदारी तक्रारी व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले. खंडपीठाने असेही नमूद केले की, पत्नीचा दावा आहे की ती आपल्या पतीशिवाय सौहार्दपूर्वक राहण्यास तयार आहे. तिने सर्व खटले मागे घेतले आहेत यावरून असे दिसते की, तिला पतीसोबत राहण्यात रस नाही. त्यानंतर न्यायालयाने क्रूरतेच्या आधारे पतीला घटस्फोट मंजूर केला.