भारतामध्ये कोविड 19 लसीचा दुसरा डोस (COVID 19 Second Dose) आणि तिसरा डोस जो "Precaution Dose" म्हणून ओळखला जाईल त्याच्यामध्ये अंतर हे 9 ते 12 महिन्यांचं असेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सध्या भारतीय बनावटीच्या कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) लसींबाबत विचार केला जात असून लवकरच त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (25 डिसेंबर) देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात आता भारतामध्ये 15-18 वयोगटातील मुलांनाही कोविड 19 ची लस दिली जाईल असं सांगितले आहे. हे लसीकरण 3 जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे. तर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांना कोविड 19 लसीचा Precaution Dose 10 जानेवारी 2022 पासून दिला जाणार आहे. तसेच काल DCGI कडून 12 वर्षांवरील मुलांना कोवॅक्सिन लस देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: PM Narendra Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे, 'या' महत्वाच्या केल्या घोषणा .
जगामध्ये सुरू असलेला ओमिक्रॉनचा धुमाकूळ आणि त्यामध्ये वाढती देशातील कोरोनाबाधितांची संख्या यामुळे बुस्टर डोसची मागणी वाढत होती. भारतात साठी पार आणि सहव्याधी असणार्यांनाही कोविड 19 लसीचा बुस्टर डोस डॉक्टरांच्या सल्ल्याने दिला जाणार आहे.
भारतामध्ये 61% लाभार्थी नागरिकांनी कोविड 19 चे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तर 90% लाभार्थी नागरिकांनी कोविड 19 चा किमान एक डोस घेतला आहे. आज सकाळ पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार देशात 141.37 कोटी डोस देण्यात आले आहेत.