West Bengal Assembly Elections 2021: ममता बॅनर्जी नंदीग्राम येथून लढणार, 291 TMC उमेदवारांची यादी जाहीर; 100 नव्या चेहऱ्यांना संधी
TMC Chief Mamata Banerjee | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Elections 2021) डोळ्यासमोर ठेऊन तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाने आज आपल्या 291 उमेदवारांची यादी जाहीर केली. तृणमूल काँग्रेसच्या सर्व्हेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या ( West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ही यादी जाहीर केली. ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेस या वेळी एकूण 294 पैकी 291 जागांवर निवडणूक लढवत आहे. 3 जागांवर तृणमूल काँग्रेस निवडणूक लढवणार नाही. या तीन जागा मित्रपक्षांना सोडण्यात येत आहेत. तसेच, ममता बॅनर्जी या स्वत: नंदीग्राम (Nandigram) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले.

ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ममता बॅनर्जी या शुक्रवार हा आपल्यासाठी लकी दिवस मानतात. त्यामुळे त्यांनी या वेळी उमेदवार यादी जाहीर करतानाही शुक्रवारचीच निवड केली. विशेष म्हणजे या आधी 2011 आणि 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी यांनी उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी शुक्रवारचाच दिवस निवडला होता.

दरम्यान, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या ममता बॅनर्जी यांचा सामना सुवेंदू अदिकारी यांच्याशी होणार हे जवळपास निश्चित आहे. परंतू, ममता यांचा सामना नक्की कोणाशी होणार याची स्पष्टता भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर होणार आहे. भाजपने अद्याप आपली उमेदवार यादी जाहीर केली नाही. दरम्यान, ममता बॅनर्जी यांचा पारंपरीक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भवनीपूर येथून सोवनदेब चट्टोपाध्याय हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या उमेदवार यादीचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी या वेळी जवळपास 100 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात 50 महिला आणि 42 मुस्लिम चेहऱ्यांचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, टीएमसीने त्याच उमेदवारांना तिकीट दिले. ज्यांना जनता पाठिंबा देऊ इच्छिते. काही लोकांना तिकीट मिळू शकले नाही. परंतू, प्रयत्न केला जाईल की त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येईल.

प्राप्त माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी 28 विद्यमान आमदारांना तिकीट दिले नाही. यात अर्थमंत्री अमित मित्रा यांचाही समावेश आहे. दुसऱ्या बाजूला ममता बॅर्जी यांनी म्हटले आहे की, पक्षाने या वेळी वय वर्षे 80 पेक्षा अधिक असलेल्यांना तिकीट दिले नाही. पक्षाने प्रत्येक जात समूहाला सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याचेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले.