West Bengal Assembly Election 2021: ममता बॅनर्जी यांच्यावरील बंदी म्हणजे लोकशाहीच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला- संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credit: ANI)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee) यांच्यावर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीदरम्यान प्रचारबंदी लादली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ममता बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 (West Bengal Assembly Election 2021) मध्ये प्रचारासाठी 24 तासांची बंदी आहे. या बंदीवरुन शिवसेना ( Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरील बंदी म्हणजे लोकशाहीच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे. या हल्ल्याविरोधात आम्ही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देत आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचारासाठी 24 तासांची बंदी घातली आहे. स्पष्ट आहे की ही बंदी भारतात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरुनच घातली गेली आहे. ही बंदी लोकशाहीच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे. त्यामुळे या बंदीविरोधात ममता बॅनर्जी यांना आमचा पाठिंबा आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on Lockdown: पश्चिम बंगालमधील निवडणूक रॅली संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाभरातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेतील; संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणा)

निवडणूक आयोगाच्या बंदीविरोधात धरणे

निवडणूक आयोगाने घातलेल्या प्रचारबंदी विरोधात ममता बॅनर्जी या कोलकाता येथील गांधी मूर्तीजवळ धरने धरुन बसल्या आहेत. त्या निवडणूक आयोगाच्या बंदीविरोधात आंदोलन करत आहेत. व्हिलचेअरवर बसून ममता बॅनर्जी गांधी पुतळ्याजवळ पोहोचल्या. या ठिकाणी ममता बॅनर्जी यांनी एक चित्र रेखाटले आणि लोकांनाही दाखवले.

ममतांवर 24 तासांची बंदी

मुख्य निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक प्रचारासाठी 24 तासांची बंदी घातली आहे. सोमवारी (12 एप्रिल 2021) रात्री 8 वाजलेपासून ही बंदी लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी ही घोषणा केली. ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेदरम्यान मुस्लिम मतदारांना मतविभाजन टाळण्याचे अवाहन केले होते.

काय म्हटले होते ममता बॅनर्जी यांनी?

रायदिघी येथील सभेत ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते की, माझ्या अल्पसंख्याक बंधु-भगीनिंनो मी हात जोडून विनंती करते की, त्या सैतानांचे ऐकू नका. ज्यांनी भाजपकडून पैसे घेतले आहेत. त्यांचे ऐकून आपले मत विकू नका. मतविभाजन करु नका. ते हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष होईल अशी सांप्रदायीक विधाने करतात. ते भाजपने पाठवलेले लोक आहेत. जर भाजपची सत्ता आली तर तुम्ही संकटात सापडाल. ममता बॅनर्जी यांच्या या विधानावरुन 7 आणि 8 एप्रिलला त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवले होते.

दरम्यान, या नोटीशीबाबत ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते की, अशा प्रकारची 10 नोटीसा जरी पाठवल्या तरी आपण आपले विधान मागे घेणार नाही.