देशासह महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून अनेक भागांना वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा बसला आहे. राज्यातील अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे रबी पिकांसह फळबागांची मोठी नासधूस झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आजपासून गुरुवारपर्यंत देशातील अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. (हेही वाचा - Maharashtra Rain Alert: विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचा सल्ला)
भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे. शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके झाकून ठेवावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, चंदीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूर येथे ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या काही प्रांतासह गारपीटीचीही शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.